तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेल्वे ‘ऑफ द ट्रॅक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 05:58 AM2019-04-11T05:58:45+5:302019-04-11T05:58:47+5:30
प्रवाशांना मनस्ताप : वडाळा डेपोनजीक विस्कळीत झालेली सेवा तासाभरानंतर पूर्ववत
मुंबई : चेंबूर-वडाळा-संत गाडगे महाराज चौक या टप्प्यावर आता मोनोरेल्वे धावू लागली असली, तरीदेखील तिचे रडगाणे सुरूच असल्याचे चित्र आहे. कारण बुधवारी सकाळी वडाळा डेपोनजीक तांत्रिक बिघाड झाल्याने मोनोरेल्वे पुन्हा एकदा बंद पडली आणि प्रवाशांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागले.
बिघाडामुळे तब्बल एक तासाहून अधिक काळ मोनोरेल्वेसेवा ठप्प पडली होती. त्यामुळे मोनोरेल्वेचा गाडा सुरळीपणे रुळावर कधी येणार, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात असून, त्यांच्या सुरक्षित प्रवासाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून २००९ साली मोनोरेल्वेचे काम हाती घेण्यात आले. मोनोरेल्वेच्या प्रकल्प आखणीकरिता प्राधिकरणाने स्कोमीची नेमणूक केली. चार वर्षे काम केल्यानंतर २०१४ साली चेंबूर ते वडाळा या पहिल्या टप्प्यावर मोनोरेल्वे धावू लागली. मात्र, अनेकदा तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेल्वे बंद पडली. महत्त्वाचे म्हणजे, मधल्या काळात मोनोरेल्वेच्या डब्याला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेमुळे तब्बल दहा महिन्यांहून अधिक काळ मोनोरेल्वेची सेवा बंद ठेवण्यात आली. याच काळात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, स्कोमीमधील अंतर्गत वादामुळे प्राधिकरणाने स्कोमीला मोनोरेल्वेपासून दूर सारले आणि मोनोरेल्वेचा संपूर्ण कारभार प्राधिकरणाने हाती घेतला.
मोनोरेल्वेचा कारभार प्राधिकरणाने हाती घेतल्यानंतर वडाळा ते संत गाडगे महाराज चौक या दुसऱ्या टप्प्यावरही मोनोरेल्वे धावू लागली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ करण्यात आला. आठवडाभर मोनोरेल्वे प्रवाशांनी भरभरून वाहू लागली. त्यानंतर मोनोरेल्वेच्या प्रवाशांना उतरती कळा लागली आणि प्रवाशांचा लाखांचा टप्पा पुन्हा खाली घसरू लागला. दरम्यान, बुधवारी सकाळी वडाळा डेपोनजीक वीज पुरवठ्यात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मोनो तासभर ठप्प झाली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सहप्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांच्या म्हणण्यानुसार, सकाळी १० ते पावणे अकरादरम्यान सेवा खंडित झाली.
तज्ज्ञांचा अभाव असल्याचा प्रवाशांचा सूर
या घटनेनंतर विशेषत: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे मोनोरेल्वे रुळावर सुरळीत ठेवण्यासाठीची तज्ज्ञ मंडळी नसल्याचा, तसेच प्रवाशांचा जीव धोक्यात असल्याचा नाराजीचा सूर प्रवाशांमध्ये आहे. मात्र, प्राधिकरणाने यावरही आपली भूमिका मांडली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मोनोरेल्वे रुळावर सुरळीत ठेवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत आणि मोनोरेल्वेचे प्रवासी सुखरूप आणि सुरक्षित असावेत, यासाठी आम्ही कार्यरत आहोत.