Join us

मोनोरेलच्या कामाची पाहणी

By admin | Published: October 23, 2015 3:15 AM

मध्य रेल्वेवरील करी रोड स्थानक येथे सुरू असलेल्या मोनोरेलच्या कामांची पाहणी महापौर स्नेहल आंबेकर यांनी केली. पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांनी येथील समस्या

मुंबई : मध्य रेल्वेवरील करी रोड स्थानक येथे सुरू असलेल्या मोनोरेलच्या कामांची पाहणी महापौर स्नेहल आंबेकर यांनी केली. पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांनी येथील समस्या मार्गी लावण्यासाठी महापालिका अधिकारी आणि रेल्वे प्रशासनाची महापौर दालनात संयुक्त बैठक घेण्यात यावी, असे निर्देश दिले.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने चेंबूर-वडाळा-संत गाडगे महाराज चौक (महालक्ष्मी) या मार्गातील दुसऱ्या टप्प्याचे म्हणजे वडाळा ते संत गाडगे महाराज चौक मार्गाचे काम सुरू आहे. या कामामुळे वाहतुकीला अडचणी येत असून, स्थानिकांनीही महापालिकेकडे येथील तक्रारींचा पाढा वाचला आहे. यावर महापौरांनी मुंबई मोनोरेल टप्पा दोन आणि प्रस्तावित करी रोड रेल्वे स्थानक पादचारी पुलाची पाहणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत केली.जी/दक्षिण विभागात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सुमारे १.७ किलोमीटर अंतराची मोनोरेलची कामे सुरू आहेत. या विभागात नागरिकांच्या सुविधेसाठी मोनोरेलची दोन स्थानके निर्माण करण्यात येत आहेत. महापौरांनी करी रोड स्थानकाच्या परिसरातून प्रस्तावित असलेल्या ३.६६ मीटर रुंद पादचारी पुलाच्या ठिकाणांची पाहणी केली. या प्रस्तावित असलेल्या पादचारी पुलाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणींबाबत संबंधित महापालिका अधिकारी आणि रेल्वे प्रशासनाची संयुक्त बैठक लवकरच आयोजित करण्याचे निर्देश दिले.करी रोड परिसर मध्य आणि पश्चिम रेल्वेलगत असल्याने या भागात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. तेव्हा नागरिकांच्या सोयी-सुविधांच्या अनुषंगाने या भागातील कामे त्वरित करावीत, असेही निर्देश महापौरांनी या वेळी दिले. (प्रतिनिधी)