- अजय परचुरेमुंबई : गेल्या ९ महिन्यांपासून बंद असलेल्या मोनोरेलच्या मार्गातील विघ्ने दूर झाली आहेत. गणेशोत्सवापूर्वी ती प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची खात्रीलायक माहिती एमएमआरडीएच्या सूत्रांकडून ‘लोकमत’ला मिळाली आहे. मात्र, ही मोनोरेल्वे चेंबूर ते वडाळा या जुन्याच मार्गावर अर्थात सध्यातरी पहिल्याच टप्प्यापुरती धावेल. मोनोरेलचा चेंबूर ते सातरस्ता असा दुसरा टप्पा सुरू व्हायला मात्र वेळ लागेल.फेब्रुवारी २०१४ला सुरू झालेली मोनोरेल अपुऱ्या प्रवाशांमुळे अक्षरश: रडतखडत सुरू होती. त्यातच नोव्हेंबर २०१७ला म्हैसूर कॉलनी स्थानकात लागलेल्या आगीत मोनोचे बरेच नुकसान झाले होते. तेव्हापासून मोनोची सेवा ठप्प झाली. अनंत अडचणींच्या ट्रॅकवर अडकलेल्या मोनोला पुन्हा ट्रॅकवर आणण्यासाठी एमएमआरडीए प्रशासनाने बरेच प्रयत्न केले. मात्र, त्यानंतरही मोनोरेलची गाडी ट्रॅकवर आलीच नाही. त्यातच मोनोचे तांत्रिक व्यवस्थापन सांभाळणाºया स्कोमी कंपनीसोबतचा करारही संपुष्टात आल्याने मोनो प्रशासनाने नव्याने तांत्रिक व्यवस्थापनासाठी निविदा जाहीर केल्या. मात्र त्याला तेव्हाही म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर प्राधिकरणाने तांत्रिक व्यवस्थापन सांभाळण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडे (एमआरव्हीसी) विचारणा केली. सुरुवातीला अनुत्सुक असणाºया एमआरव्हीसीने आता पहिल्या टप्प्यासाठीची ही जबाबदारी घेण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यासंदर्भात एमएमआरडीए आणि एमआरव्हीसी यांच्यात अंतिम टप्प्यात चर्चा असून ती यशस्वी होईल अशी ठोस माहिती एमएमआरडीएच्या सूत्रांकडून मिळाली आहे.एमएमआरडीएच्या म्हणण्यानुसार, २०१४ला चेंबूर ते वडाळा या मार्गादरम्यान अपुरी प्रवासी क्षमता होती. याला महत्त्वाचे कारण होते ते या भागातील अपुरी लोकसंख्या आणि सुविधांचा अभाव. मात्र गेल्या ४ वर्षांत प्रतीक्षानगर आणि आसपासच्या परिसरात झपाट्याने नागरी वस्ती वाढली असून या मार्गावर लोकांना प्रवासासाठी मोनोरेल महत्त्वाची ठरणार आहे.तसेच मेट्रोच्या तुलनेत मोनोचे भाडे कमी असल्याने मोनोला या वेळी चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास प्राधिकरणाला आहे. मुंबईत गणेशोत्सवादरम्यान प्रत्येक मंडळातील गणपती पाहायला मुंबईकर मोठ्या संख्येने घराबाहेर पडतात. त्यामुळे सणाच्या काळात मुंबईकरांच्या प्रवासाची चांगली सोय होईल व त्यांचा मोर्चा मोनोकडे वळेल आणि त्याचा निश्चित फायदा मुंबईकरांसह मोनोलाही होईल असा प्राधिकरणाला विश्वास आहे.याचा फायदा करून घेण्यासाठी ते कामाला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर तांत्रिक अडचणी सोडवून, मोनोची ट्राय रन सुरू करण्यात आली असून येत्या गणेशोत्सवाच्या आधीच मोनोला ट्रॅकवर आणण्यासाठी प्राधिकरणाने कंबर कसली आहे.दुसरा टप्पा लांबणीवर : पहिला टप्पा ट्रॅकवर आला की, कंत्राटदार दुसºया टप्प्याचे काम घेण्यास उत्साह दाखवतील, असा विचार प्राधिकरण करीत आहे. त्यामुळे पुढचे सहा महिने तरी वडाळा ते सातरस्ता या दुसºया टप्प्यावर मोनोची सवारी दिसेल, असे आता तरी दिसत नाही.
मोनोरेलच्या मार्गातील विघ्न दूर!; चेंबूर ते वडाळा पहिला टप्पा पुन्हा सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 5:04 AM