मान्सून २०२० : सप्टेंबरमधील पहिले कमी दाबाचे क्षेत्र आणखी पाऊस घेऊन येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 03:28 PM2020-09-18T15:28:00+5:302020-09-18T15:28:29+5:30
याचा प्रभाव बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशावर राहील; येथे मोठा पाऊस होईल.
मुंबई : बंगालच्या खाडीतून येणा-या सप्टेंबर महिन्यातील पहिल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशाच्या विभिन्न राज्यात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे. याचा प्रभाव बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशावर राहील; येथे मोठा पाऊस होईल.
म्यानमारकडून हे कमी दाबाचे क्षेत्र येईल. यामुळे मान्सून आणखी सक्रीय होईल. पावसाचा जोर वाढेल. जूनपासून सप्टेंबरपर्यंत पडलेल्या मुसळधार पावसाचा शेवट कदाचित या कमी दाबाच्या क्षेत्राच्या मुसळधार पावसाने होईल, अशी शक्यता आहे. २१ सप्टेंबरच्या आसपास हे कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगाल, उत्तर ओरिसाच्या आतील भागात प्रवेश करेल. याचवेळी जमिनीवर प्रवेश केलेल्या या क्षेत्राचा प्रभाव छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशावर राहील.
मध्य भारतात प्रवेश केल्यानंतर याचा वेग किंचित कमी होईल. त्यानंतर त्याचा प्रवास राजस्थानकडे होईल. २४ सप्टेंबरच्या आसपास हे क्षेत्र मध्य प्रदेशावर राहील. याचा प्रभाव बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशावर राहील; येथे मोठा पाऊस होईल. राजस्थान आणि दिल्लीवर पावसाचे ढग राहतील. पाऊस मात्र पडणार नाही. दरम्यान, याच काळात राजस्थानातून मान्सून आपला परतीचा प्रवास सुरु करणार आहे.