मान्सून : बांधकामाचा भाग कोसळून ३ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 06:36 PM2020-06-18T18:36:31+5:302020-06-18T18:37:03+5:30
मुंबई शहर आणि उपनगरात मान्सूनचा जोर वाढतच असतानाच पडझडीच्या घटनांमध्ये वाढ होते आहे.
कुलाबा : २६ मिमी
सांताक्रूझ : ३६ मिमी
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात मान्सूनचा जोर वाढतच असतानाच पडझडीच्या घटनांमध्ये वाढ होते आहे. गुरुवारी मुंबईत पावसाने जोर पकडला असतानाच दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास जोगेश्वरी येथे बांधकामाचा भाग कोसळून ३ जण जखमी झाले. तर कुर्ला येथे बाराच्या सुमारास एका इमारतीचा भाग कोसळला. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही. गुरुवारी दिवसभर कोसळलेल्या पावसाने चेंबुर, मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, मालवणी, मलबार हिल, कांदिवली, बोरीवली, दहिसरसह गोरेगावलगतच्या परिसराला मोठया प्रमाणावर झोडपून काढले.
गुरुवारी सकाळपासूनच मुंबईत पावसाने जोर पकडला. दुपारी पावसाने आणखी वेग घेतला. पाऊस कोसळत असतानाच जोगेश्वरी येथील मेघवाडीतल्या तळमजला अधिक दोन मजली चाळीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. या घटनेत सकिरा शेख, तौसिफ शेख, फतिमा कुरेशी हे तीन जण जखमी झाले. कुपर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करत त्यांना सोडण्यात आले. कुर्ला पश्चिम येथील सीएसटी मार्गावरील मेहता इमारतीचा काही भाग कोसळला. गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने इमारतीचा जो भाग कोसळला; त्या भागात कोणीच राहत नसल्याने मोठी हानी टळली. जानेवारी महिन्यात या इमारतीला मोठी आग लागली होती. यानंतर महानगरपालिकेने ही इमारत धोकादायक असल्याचे सांगितले होते. गुरुवारी दुपारी मुसळधार पाऊस कोसळत असताना बाराच्या सुमारास आजुबाजूच्या नागरिकांना काहीतरी कोसळल्याचा मोठा आवाज आला. यानंतर इमारतीचा काही भाग कोसळला असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली.