मान्सून सक्रिय; मुंबईसह महाराष्ट्राला दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:06 AM2021-07-09T04:06:11+5:302021-07-09T04:06:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हवामान अनुकूल नसल्याने मुंबईसह महाराष्ट्राकडे मान्सूनने पाठ फिरवली होती. मात्र, आता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हवामान अनुकूल नसल्याने मुंबईसह महाराष्ट्राकडे मान्सूनने पाठ फिरवली होती. मात्र, आता बंगालच्या उपसागरासह हवेच्या वरील स्तरात झालेल्या हवामान बदलामुळे मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. गुरुवारी सकाळपासून मुंबई शहरासह उपनगरात पाऊस पडला. या जलधारांमुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे, तर राज्यातदेखील मान्सून सक्रिय होत असून येत्या चार ते पाच दिवसांत राज्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.
मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी सांगितले की, एका मोठ्या विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. मान्सूनसाठीचे हवामान अनुकूल झाले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि हवेच्या वरील स्तरात अनुकूल असलेले हवामान यामुळे महाराष्ट्रात येत्या चार ते पाच दिवसांत चांगल्या स्वरूपाचा पाऊस होईल. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडील माहितीनुसार, गेल्या २४ तासांत विदर्भात जोरदार, कोकण, गोवा आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. ९ जुलै रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, तर काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होईल, अशी शक्यतादेखील वर्तविण्यात आली आहे.