कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सून सक्रिय; परतीच्या पावसाला फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 06:36 AM2019-09-29T06:36:51+5:302019-09-29T06:37:15+5:30
बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे मान्सून सक्रिय असून, मान्सूनच्या परतीचा प्रवास मात्र आॅक्टोबरपर्यंत लांबला आहे.
मुंबई : बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे मान्सून सक्रिय असून, मान्सूनच्या परतीचा प्रवास मात्र आॅक्टोबरपर्यंत लांबला आहे. परिणामी, मान्सूनचा मुक्काम आणखी वाढला असून, तोवर मान्सून देशासह राज्यभरात ठिकठिकाणांना झोडपून काढणार आहे.
स्कायमेटकडून मिळालेल्या माहितीनुसार, मान्सूनच्या हंगामात पाऊस पडण्यासाठी कमी दाबाचे क्षेत्र एक महत्त्वपूर्ण घटक आहे. सध्या अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही ठिकाणी ते आहे. सामान्यत: सप्टेंबरच्या शेवटी या यंत्रणेची वारंवारता कमी होते. मात्र या वेळी अशी परिस्थिती नाही. नुकतेच अरबी समुद्रात उठलेले हिक्का हे चक्रिवादळ आता शमले आहे. महाराष्ट्राची दक्षिण किनारपट्टी आणि गोवा-कर्नाटक आणि पूर्व-मध्य अरबी समुद्रात असलेले चक्रीय परिभ्रमण आता कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतरित झाले असून सद्य:स्थितीत अरबी समुद्रात गुजरात आणि कोकण किनारपट्टीलगत आहे.
या कारणात्सव गुजरात, कोकण आणि सौराष्ट्रात ठिकठिकाणी मुसळधार सरी नोंदविल्या जातील. ४८ तासांत, विशेषत: पुढचे तीन दिवस गुजरातमध्ये अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. आग्नेय राजस्थान, कोकण विभाग आणि नैर्ऋत्य मध्य प्रदेशात काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागात ३० सप्टेंबरपर्यंत तुरळक जोरदार सरींसह पावसाचा जोर कायम राहील. त्यानंतर पाऊस ओसरण्यास सुरुवात होईल. हे सर्व घटक मान्सूनच्या परतीस अडथळा आणत असून परतीचा प्रवास आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लांबणार आहे.|
बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, मिझोरम, त्रिपुरा आणि बांगलादेशच्या या भागांत चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. बांगलादेशसह ईशान्य भारतामध्ये काही ठिकाणी जोरदार सरींसह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व आणि ईशान्य भारतात पावसाची तूट आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये नुकत्याच झालेल्या पावसासह संभाव्य आगामी प्रणाली तूट कमी करण्यास मदत करेल. दरम्यान, मान्सूनचा हंगाम ३० सप्टेंबर रोजी संपेल आणि या तारखेनंतरच्या पावसाळी हालचाली मान्सून हंगामात मोजल्या जाणार नाहीत.
गुजरातला रेड अलर्ट
अरबी समुद्राच्या उत्तर पूर्वेकडील भागात म्हणजे सौराष्ट्रलगत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. परिणामी, रविवारसाठी गुजरातला हवामान खात्याकडून ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. २९ सप्टेंबर रोजी समुद्र खवळलेला राहील. त्यामुळे या दिवशी मच्छीमारांनी मासेमारीसाठी उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. दरम्यान, रविवारपासून नवरात्रौत्सव सुरू होत असून, उत्सवाच्या काळातच पावसाचा मारा होण्याची शक्यता आहे.