Join us

मान्सून सक्रीय; ३ दिवस मारा कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 6:26 PM

पावसाचा जोर कायम होता.

‘त्या’ व्हिडिओमध्ये मुंबईत ढगात हरविली - नेटकरी 

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवारी देखील पावसाचा जोर कायम होता. सकाळी रिमझिम सुरु  असलेल्या पावसाने दुपारी मात्र चांगला जोर पकडला होता. सायंकाळी पुन्हा पावसाने विश्रांती घेतली होती. मान्सून पुन्हा एकदा वेगाने सक्रीय झाला असून, पुढील ३ दिवस पावसाळी वातावरण कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शुक्रवारी सकाळी मुंबईत ४१ मिलीमीटर एवढया पावसाची नोंद झाली. पाऊस कोसळत असतानाच ४ ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. १७ ठिकाणी झाडे कोसळली. ५ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या. शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता मुंबईत १४.४ मिलीमीटर एवढया पावसाची नोंद झाली. पाऊस कोसळत असतानाच शुक्रवारी पहाटे गिरगाव येथे भूलेश्वर रोडवरील तळमजला अधिक चार मजली लायब्ररी इमारतीच्या भिंतीचा भाग पडला. सुदैवाने यात जिवीतहाने झाली नाही.

सोशल नेटवर्क साईटवर म्हणजे फेसबुक, व्हॉटस अ‍ॅप, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर शुक्रवारी दुपारनंतर एक व्हिडिओ मोठया प्रमाणावर व्हायरल झाला. लोअर परळ, वरळी येथील लोढा वर्ल्ड टॉवर्समधील वर्ल्ड वनच्या ८० व्या माळ्याहून टिपण्यात आलेले हे दृश्य आहे, असा दावा या व्हिडिओद्वारे नेटक-यांनी केला. यामध्ये हा परिसर संपुर्णपणे ढगात हरविल्याचे दृश्य होते. इमारतींवर देखील ढग होते. आणि मुंबई जणू काही ढगात हरविल्याचे चित्र होते. ढग वेगाने पुढे सकरत होते. आणि उंच इमारती सोडल्या तर केवळ ढग आणि ढगच यात दिसत होते. एखाद्या हॉलीवूड चित्रपटातील दृश्य भासावे; असा हा व्हिडीओ होता. मात्र हा व्हिडिओ मुंबईतलाच आहे का? याबाबत मात्र कोणीच दुजोरा दिला नाही. हवामान खात्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, मान्सून जेव्हा सक्रीय असतो. तेव्हा वातावरण असे असते. ढग खाली उतरतात. अगदी इमारतीजवळही येतात. म्हणजे कमी उंचीवर येतात. मुंबईत बहुतांशी वेळेला असे चित्र असते. मात्र शुक्रवारी सोशल नेटवर्क साईटवर जो व्हिडिओ व्हायरल झाला तो मुंबईतलाचा असावा, याबाबत मात्र काहीच सांगता येणार नाही.  

टॅग्स :मानसून स्पेशलपाऊसमुंबई मान्सून अपडेट