पुढील पाच दिवस धोक्याचे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अतिवृष्टी घेऊन दाखल झालेल्या मान्सूनने पहिल्याच दिवशी मुंबईची दाणादाण उडवून टाकली. बुधवारी मान्सून मुंबई, ठाणे, पालघर आणि नागपूरमध्ये दाखल झाल्याची घोषणा करतानाच पुढील पाच दिवस कोकण किनारपट्टीला धोकादायक असतील, असा इशाराही हवामान खात्याने दिला. पुढील पाच दिवस कोकण किनारी पावसाचा धिंगाणा सुरू राहणार असून, विशेषत: मुंबईला ऑरेंज अलर्ट दिल्याने येथील सर्वच यंत्रणांना सतर्क रहावे लागणार आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी सांगितले की, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात मान्सून बुधवारी दाखल झाला. कोकण किनारपट्टीला बुधवारी काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट, तर काही ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आला होता. सोबत मुंबईलाही बुधवारी रेड अलर्ट देण्यात आला होता. आता मुंबईला पुढील चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर येत्या पाच दिवसांसाठी संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागातील वरिष्ठ वैज्ञानिक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मान्सूनची आजपर्यंतची वाटचाल मुंबई, ठाणे, पालघर आणि नागपूरपर्यंत झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे ९ जून रोजी मान्सून मुंबईत दाखल झाला असून तीन वर्षांपूर्वी म्हणजे २०१८ सालीही ताे ९ जून रोजी मुंबईत दाखल झाला होता. राज्याचा विचार करता १ ते ९ जूनपर्यंत मुंबई आणि ठाण्यासह राज्याच्या बहुतांश भागात सरासरीच्या तुलनेत अधिक पावसाची नोंद झाली आहे. मान्सून येत्या दोन ते तीन दिवसांत संपूर्ण राज्य व्यापेल.
......................................................