मान्सूनने उत्तर भारतही काबीज केला; पण मुंबई कोरडीच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 06:14 AM2019-06-28T06:14:57+5:302019-06-28T06:15:12+5:30
मान्सूनची वाटचाल गुरुवारी मध्य अरबी समुद्र, कोकण, मध्य महाराष्ट्राचा उर्वरित भाग, उत्तर अरबी समुद्र, दक्षिण गुजरातचा काही भाग तसेच मध्य प्रदेशच्या आणखी काही भागात सुरू झाली आहे.
मुंबई : मान्सूनची वाटचाल गुरुवारी मध्य अरबी समुद्र, कोकण, मध्य महाराष्ट्राचा उर्वरित भाग, उत्तर अरबी समुद्र, दक्षिण गुजरातचा काही भाग तसेच मध्य प्रदेशच्या आणखी काही भागात सुरू झाली आहे. ती उत्तर भारतात वेगाने सुरू असून, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड ही राज्ये मान्सूनने काबीज केली असली तरी किनारपट्टीवरील मुंबई मात्र कोरडीच आहे. मान्सून मुंबईत दाखल होऊन तीन दिवस उजाडले तरी अद्याप येथे पावसाचा शिडकावाही झाला नसल्याने घामाघूम मुंबईकर आता पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत दक्षिण कोकणात मुसळधार पावसाची नोंद झाली. जैतापूर येथे १९२ मिलीमीटर, रत्नागिरी येथे १३४, सिंधुदुर्ग येथे १५०, मालवण येथे १८१ तर देवगड येथे ११९ मिमी पाऊस नोंदविण्यात आला. कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार, तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. येत्या ३ ते ४ दिवसांत पश्चिम किनारपट्टीसह मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात मुळसधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला.
मुंबईत हलक्या सरींची शक्यता
२८ जून : शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२, २५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.
२९ जून : शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल. कमाल आणि किमान तापमान ३०, २४ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.
कोकण, गोव्यात जोरदार
२७ जून : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
२८ जून : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
२९ जून : कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार, तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
नाशिकमध्ये पावसाचे दोन बळी
नाशिक जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या पावसामुळे दोघांचे बळी गेले. निफाड तालुक्यातील पिंपळस शिवारात रूपाली भोई (१८) या मुलीच्या अंगावर वीज पडून तिचा मृत्यू झाला. पत्र्याच्या पानटपरीमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने पुवप्पा कलाल (५२) यांचा शॉक लागून मृत्यू झाला.