मुंबईत दिवसभर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळला : संरक्षक भिंत कोसळून ज्येष्ठ नागरिक जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात बुधवारीदेखील मान्सूनचा तडाखा सुरूच होता. मंगळवारी आणि बुधवारी मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली असून, १४ जुलैच्या सकाळी ८ वाजेच्या नोंदीनुसार मुंबईत १११.२ मिलिमीटर पाऊस पडला आहे, तर पावसाचा तुफान मारा गुरुवारीदेखील सुरूच राहणार असून, कोकण विभागात रत्नागिरी जिल्ह्याला रेड तर रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईत गुरुवारी सकाळी पावसाची रिमझिम सुरू होती. दुपारी काही काळ पाऊस उघडला. सायंकाळी पुन्हा पावसाने वेग पकडला. मात्र सायंकाळी पावसाचा जोर संथ होता. पावसाची रिमझिम सुरू असतानाच एकूण चार ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. मंगळवारी रात्री ९ वाजता माझगाव येथील जम जम मस्जिदशेजारी असलेली संरक्षक भिंत कोसळून रिझवान सय्यद हे ज्येष्ठ नागरिक किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले, तर एकूण १३ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. १५ ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या असून, गुरुवारी देखील मुंबईत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे.
१५ जुलै रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. किनारी भागात सोसाट्याचा वारा वाहील. मध्य महाराष्ट्रात घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. विदर्भातही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
१६ जुलै रोजी देखील कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. किनारी भागात सोसाट्याचा वारा वाहील. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भालाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.