मुंबई : दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टी ते केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, विदर्भ व लगतच्या दक्षिण छत्तीसगडवर चक्रीय चक्रवात तयार झाले आहे. हवामानात झालेल्या बदलामुळे मुंबईसह राज्यभरात पाऊस सक्रिय झाला असून, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा एकदा मान्सूनच्या नोंदीने चढा आलेख गाठला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. २० ऑगस्ट रोजी कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातही बहुतांश ठिकाणी पावसाची, तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यासह विदर्भातही बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. २१ ऑगस्ट रोजीही राज्यभरात असेच हवामान राहील. २२ आणि २३ ऑगस्ट रोजी मात्र कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा मारा किंचित कमी होईल. मात्र पावसाचे वातावरण कायम राहील.
या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस
ठाणे, पालघर, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यांत शुक्रवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित जिल्ह्यांत पावसाचा जोर कमी राहील.
मुंबईत जोरदार
मुंबईत ४२.५ मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. येत्या २४ तासांत मुंबईत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
पडझड कायम
मुंबईत अधूनमधून पावसाचा मारा सुरू आहे. यात पडझड होत असून, पाच ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. सहा ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. आठ ठिकाणी झाडे कोसळली.
कांदिवली पूर्व येथील पोईसरमधल्या कमलेश कम्पाऊंडमधील सार्वजनिक शौचालयाचा भाग कोसळला. यात तिघेजण जखमी झाले. उदय पांडे, जय शहा, शिवम पांडे अशी जखमींची नावे असून, कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करीत त्यांना सोडून देण्यात आले.