Join us

वाऱ्याच्या वेगाने मान्सून रविवारी मुंबईत दाखल; सर्वसाधारण तारखेपेक्षा दोन दिवस अगोदरच हजेरी

By सचिन लुंगसे | Published: June 09, 2024 12:51 PM

मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाकडून मान्सून मुंबईत दाखल झाल्याची घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: वाऱ्याच्या वेगाने मान्सून आज अखेर रविवारी मुंबईत दाखल झाला आहे. मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाकडून मान्सून मुंबईत दाखल झाल्याची घोषणा करण्यात आली असून सर्वसाधारण तारखांच्या तुलनेत मान्सून मुंबईत दोन दिवस अगोदर दाखल झाला आहे. सर्वसाधारण रित्या मान्सून मुंबईत दाखल होण्याची तारीख ११ जून आहे. यावर्षी मान्सून दोन दिवस अगोदर म्हणजे ९ जून रोजी मुंबई दाखल झाला आहे.

मान्सून दाखल झाल्यानंतर १४ तारखेपर्यंत मुंबई आणि परिसरात पावसाचा जोर किंचित का होईना कायम राहील असा, अंदाज हवामान अभ्यासाकांनी वर्तवला आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून मुंबई आणि शहर उपनगरातील उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. मुंबईवर सातत्याने ढगाळ हवामानाची नोंद होत होती. किंचित ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत होत्या. मात्र त्याचे प्रमाण तुलनेने कमी होते. मान्सून पूर्व पावसाने मुंबईत एन्ट्री केली असली तरी मान्सून दाखल होण्यास मुंबईकरांना प्रतीक्षा करावी लागत होती.

दक्षिण कोकणात दाखल झालेला मान्सून १० जूनच्या आसपास मुंबई दाखल होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. शनिवारी देखील हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार तीन दिवसात मान्सून मुंबईत दाखल होणार होता; हा अंदाज वर्तवताना हवामान खात्याने चार दिवस अधिक आणि वजा असे गृहीत धरले होते. त्यानुसार मान्सूनने रविवारी मुंबईत आगमन केले आहे. तत्पूर्वी शनिवारी रात्री मुंबई महानगर प्रदेशात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. आता मान्सून दाखल झाल्यानंतर पुढील चार महिने पावसाळ्याचे कसे असतील ? याकडे मुंबईकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटमुंबईमोसमी पाऊस