मान्सून युपीत दाखल; मुंबई कोरडीच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 07:44 PM2020-06-17T19:44:30+5:302020-06-17T19:46:47+5:30
उत्तर प्रदेशात मान्सून निर्धारित वेळेच्या एक आठवडा अगोदर दाखल झाला आहे. वाराणासी, मिर्झापूर, गोरखपुर, बलिया यांना पार करत मान्सून फतेहपूरपर्यंत दाखल झाला आहे.
मुंबई : मान्सून पश्चिम मध्य प्रदेशच्या आणखी काही भागात, पूर्व मध्य प्रदेशच्या बहुतांश भागात, पूर्व उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागात दाखल झाला असून, मुंबईत मात्र मान्सूने विश्रांती घेतली आहे. महत्त्वाचे म्हणजे मान्सून दाखल झाल्यापासून मंगळवारसह बुधवारी हलक्या सरींचादेखील वर्षाव येथे झालेला नाही. त्यामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा पावसाची वाट बघावी लागत आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार, तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. १८ जून रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. १९ ते २१ जून दरम्यान कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. मुंबईचा विचार करता १८ आणि १९ जून रोजी आकाश सामान्यत: ढगाळ राहील. मुसळधार ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, मंगळवारप्रमाणे बुधवार देखील कोरडाच गेला. मुंबईत तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. सकाळी काही मुंबईवर ढगाळ वातावरण होते. मात्र दुपारी पुन्हा कडाक्याच्या ऊन्हाने मुंबईकरांना चटके दिले. सायंकाळी दाटून आलेल्या ढगांनी पावसाची वर्दी दिली. मात्र सायंकाळही पावसाने मुंबईकरांकडे पाठ फिरवली. बुधवारी रात्री उशिरा काही ठिकाणी सरी कोसळल्या होत्या.