मान्सून एक्स्प्रेस; पुढील स्थानक मुंबई; अनुकूल वातावरण तयार-हवामान विभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 07:43 AM2021-06-09T07:43:36+5:302021-06-09T07:44:00+5:30
Rain : मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सून मुंबईत दाखल होण्यासाठी आवश्यक हवामान तयार झाल्याने मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे.
मुंबई : रायगडमध्ये मुक्कामी असलेली ‘मान्सून एक्स्प्रेस’ आता मुंबईच्या दिशेने सुसाट निघाली असून, येत्या २४ तासांत ती येथे दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सून मुंबईत दाखल होण्यासाठी आवश्यक हवामान तयार झाल्याने मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. येत्या २४ तासांत मान्सून मुंबईसह कोकणात दाखल होईल, अशी शक्यता आहे. शिवाय येत्या काही दिवसांत कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असाही अंदाज आहे.
मराठवाड्याचा बहुतांश भाग, विदर्भाचा काही भाग, तर मध्य महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली, तर कोकण, गोव्याच्या तुरळक भागांत किंचित घट झाली. उर्वरित भागांत कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.
अतिवृष्टीचा क्लायमॅक्स
मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात मंगळवारी मान्सूनपूर्व सरी कोसळल्या. सकाळी १० ते १२ वाजण्याच्या दरम्यान जवळपास दोन तास ढगांच्या गडगडाटासह झालेल्या पावसाने मुंबईकरांना काही क्षण का होईना धडकी भरविली होती. या काळातील वातावरणाने जणू ९ ते १२ जूनदरम्यान वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसारच्या अतिवृष्टीचा क्लायमॅक्सच दाखविला. दुपारी मात्र ऊन पाहायला मिळाले. तर रात्री आठनंतर उपनगरात काही ठिकाणी पुन्हा पाऊस पडला.
आज येथे लावणार हजेरी
कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी बुधवार ९ जून राेजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.