मान्सून एक्स्प्रेस : वारा, कोसळधारांसह पडझड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 06:13 AM2019-06-30T06:13:03+5:302019-06-30T06:13:35+5:30

मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडील नोंदीनुसार, शनिवारी सकाळी सांताक्रुझ येथे २१७.२ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली.

 Monsoon Express: Wind, downstream collapse | मान्सून एक्स्प्रेस : वारा, कोसळधारांसह पडझड

मान्सून एक्स्प्रेस : वारा, कोसळधारांसह पडझड

googlenewsNext

मुंबई : दाटून येणारा अंधार, वेगाने वाहणारे वारे, कधी हलकीशी येणारी सर तर कधी एकदमच अंगावर येणारा मुसळधार पाऊस; अशा काहीशा वातावरणात मान्सूनने शनिवारीही मुंबई शहर आणि उपनगराला झोडपून काढले. विशेषत: शुक्रवारप्रमाणे शनिवारीही पाऊस कोंडी करतो की काय? अशी भीती मुंबईकरांना होती. प्रत्यक्षात मात्र शनिवारी पावसाने एक पाऊल मागे घेत रिमझिम बरसात करण्यावर समाधान मानले. परंतु हा पाऊस कोसळत असतानाच ठिकठिकाणी घडलेल्या पडझडीच्या घटनांत शनिवारी मुंबईचे अतोनात नुकसानच झाले होते.
मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडील नोंदीनुसार, शनिवारी सकाळी सांताक्रुझ येथे २१७.२ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली. सकाळी आठ वाजल्यापासून कोसळणारा पाऊस दुपारी दोन वाजेपर्यंत थांबून थांबून वेगाने कोसळत होता. दुपारी दोननंतर मात्र पावसाने काहीशी विश्रांती घेतली. दरम्यान, सकाळी कोसळत असलेल्या पावसामुळे रस्ते वाहतुकीचा वेग किंचित मंदावला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, लाल बहादूर शास्त्री मार्ग, एस. व्ही. रोड, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गासह सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडवर कुठेही पावसाचे पाणी साचले नसले तरी निसरड्या रस्त्यामुळे वाहतुकीचा वेग किंचित कमी झाला होता.
कुर्ला रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील सकिना मंज़िल या धोकादायक इमारतीचा भाग दुपारी दोनच्या सुमारास कोसळल्याची घटना घडली.


मुंबईसाठी अंदाज
३० जून : शहर आणि उपनगरात तुरळक ठिकाणी जोरदार सरींसह मुसळधार पाऊस पडेल. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २७, २३ अंशाच्या आसपास राहील.
१ जुलै : शहर आणि उपनगरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २७, २३ अंशाच्या आसपास राहील.

राज्यासाठी अंदाज
३० जून : कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार आणि तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल.
१ जुलै : विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल.
२ जुलै : विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
३ जुलै : कोकण, गोवा, विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल.

१४ घरांचे भाग कोसळले
शहरात ७, पूर्व उपनगरात ४ आणि पश्चिम उपनगरात ३ अशा एकूण १४ ठिकाणी घरांचा भाग कोसळला.

३९ ठिकाणी शॉर्टसर्किट
शहरात १४, पूर्व उपनगरात १३,
पश्चिम उपनगरात १२ अशा
एकूण ३९ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या.

फांद्या कोसळल्या
शहरात २६, पूर्व उपनगरात ३४, पश्चिम उपनगरात ४४ अशा एकूण १०४ ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या.



आज मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक नाही
मुसळधार पावसाने सलग दोन दिवस रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने रविवारी मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा-मुलुंड कल्याण दिशेकडील जलद मार्गावरील मेगाब्लॉक मध्य रेल्वे प्रशासनाकडून रद्द करण्यात आला आहे. हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक कायम ठेवण्यात आला आहे. हार्बर मार्गावरील वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यान दोन्ही दिशेकडील मार्गावर सकाळी १० वाजून ३४ मिनिटांपासून
ते दुपारी ३ वाजून ४४ मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक असेल. पनवेल-मानखुर्द-पनवेल विशेष लोकल चालविण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे लोकल मार्गावर परिणाम होणार नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title:  Monsoon Express: Wind, downstream collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.