Join us

आॅक्टोबर हीटदरम्यानही मान्सूनचा तडाखा; मुंबईत गडगडाटासह बरसला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 7:16 AM

तब्बल चार महिने देशासह राज्यात ठिकठिकाणी धिंगाणा घातलेल्या मान्सूनचा तडाखा अद्यापही नागरिकांना बसत आहे. महत्त्वाचे म्हणजे १ सप्टेंबर रोजी मान्सून राजस्थानातून आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो.

मुंबई : तब्बल चार महिने देशासह राज्यात ठिकठिकाणी धिंगाणा घातलेल्या मान्सूनचा तडाखा अद्यापही नागरिकांना बसत आहे. महत्त्वाचे म्हणजे १ सप्टेंबर रोजी मान्सून राजस्थानातून आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो. प्रत्यक्षात मात्र आता ४ आॅक्टोबर उजाडला, तरी मान्सूनने आपल्या परतीचा प्रवास सुरू केलेला नाही. उलटपक्षी पाऊस चांगलाच बरसत असून, शुक्रवारी सकाळी मुंबई शहरासह उपनगरात ढगांच्या गडगडाटासह कोसळलेल्या पावसाने मुंबईकरांना धडकीच भरवली होती. दरम्यान, सकाळी ११ वाजेपर्यंत कोसळलेल्या पावसाने नंतर विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना आॅक्टोबर हीटचा तडाखा सहन करावा लागला.साधारणत: मुंबईतून मान्सून १ आॅक्टोबरच्या आसपास माघार घेतो, परंतु या वर्षी इतर भागांसह येथेही यास उशीर झाला आहे. परिणामी, माघार सुरू होईपर्यंत आणि पूर्ण होईपर्यंत मुंबईत कमीतकमी आॅक्टोबरच्या उत्तरार्धापर्यंत काही सरी कोसळू शकतात.गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत सर्वसाधारणपणे कोरडे हवामान होते. मात्र, शुक्रवारी सकाळी मुंबईत पावसाने हजेरी लावली.शहरातील अनेक भागांत चांगला पाऊस झाला. पहाटे साडेआठ ते साडेअकरा दरम्यान तीन तासांत मुंबईत १३ मिमी पाऊस पडला. पुढील एक आठवडाभर मुंबईत पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. कारण चक्रवाती परिस्थिती तामिळनाडूवर असून, तेथून उत्तर आणि गोवा आणि कोकण विभागात हवामानात बदल होत आहेत. त्यामुळे परतीच्या पावसाचा प्रवास लांबला आहे.मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुन्हा पावसाचा जोरमध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे.येते काही दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात निरंतर पाऊस सुरू राहील.८ आॅक्टोबरच्या सुमारास, उत्तर आंतरिक कर्नाटक आणि महाराष्ट्रातील लगतच्या भागात चक्रवाती परिस्थिती तयार होण्याची शक्यता आहे.दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसात वाढ होईल.कोकण आणि गोव्यातील सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरीत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :पाऊस