पावसाळी अवैध मासेमारी बंदची मागणी जोरात!
By मनोहर कुंभेजकर | Published: May 8, 2024 08:30 PM2024-05-08T20:30:08+5:302024-05-08T20:30:47+5:30
मासेमारी व्यवसाय धोक्यात आला असल्याचे पारंपरिक मच्छिमारांचे म्हणणे आहे.
मुंबई-एकंदरीत लोकसभा निवडणूकीचा प्रचार शिगेला पोचला आहे.तर कोळीवाड्यात आगामी दि,1 जून पासून मासेमारी बंदी साठी मच्छिमारांची लगबग सुरू झाली आहे.
यंदाचा मासेमारी हंगाम अतिशय खराब गेल्याने मच्छिमार चिंतेत आहे. मासे कमी, खर्च जास्त, डिझेलचे वाढलेले भाव, मच्छिमारी साधनावर बर्फ, सूत, इंजिन सामान सर्वावर लागलेला जीएसटी यामुळे मच्छिमार पूर्णपणे हवालदिल झाला आहे. एलईडी, पर्सेंसीन मासेमारी व मासेमारी बंदी कालावधीत होणारी मासेमारी यामुळे मासेमारी व्यवसाय धोक्यात आला असल्याचे पारंपरिक मच्छिमारांचे म्हणणे आहे.
भारत सरकार, मत्स्यव्यावसाय, पशुसांवर्धन मंत्रालयातर्फे भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर वार्षिक मासेमारी बंदी लागू करते. शाश्वत मासेमारी व सागरी परिसस्थांनाचे दीर्घकालीन आरोग्य सुनिश्चित करणे तसेच प्रजाजन हंगामात माश्याचे साठे अबाधित राहावेत, हे मासेमारी बंदीचे उद्दिष्ट आहे.
पश्चिम किनारपट्टीवर 1 जून ते 31 जुलै म्हणजे 61 दिवसांची मासेमारी बंदी शासनाने सुनिश्चित केली आहे. पावसाळी वादळी हवामाना मुळे जीवित हानी होऊ नये, तसेच भविष्यात माश्याचें साठे वाढावेत हा जरी उद्दिष्ट असले तरी काही मच्छिमार सरळ सरळ कायदा पायादली तुडवत असतात. बंदी कालावधीत अवैद पद्धतीने मासेमारी करत असतात. साधार्णपणे 200 पेक्षा यांत्रिक मासेमारी बोटी पावसाळी बंदी हंगामात मासेमारी करतात. मत्स्यव्यवसाय विभाग या मच्छिमारांना अभय देते असे सांगण्यात येते.कायद्याचे भय नसल्याने पावसाळी मासेमारी फोफावत असल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे उपाध्यक्ष प्रदीप टपके यांनी केला.
पावसाळी मासेमारी पूर्णतः बंद करावी ही मागणी कोळीवाड्यामध्ये जोर धरत आहे. मच्छिमार संघटना, सहकारी संस्था पावसाळी मासेमारी बंदी करिता अग्रेसर आहेत. महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती तसेच अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने आयुक्त मत्स्यव्यासया यांना पत्र पाठवून बंदी कालावधीत मासेमारी करणाऱ्या बोटीवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
या संदर्भात महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो यांच्या अध्यक्षतेखाली मढ मच्छिमार कृती समितीची नुकतीच बैठक झाली.यावेळी वेसावे,मढ,भाटी,मालवणी मनोरी,गोराई येथील मच्छिमार सहकारी सोसायट्यांच्या संचालक मंडळाची बैठक झाली.या बैठकीत बंदी कालावधीत मासेमारी करणाऱ्या बोटीवर कडक कारवाई करावी अशी आग्रही मागणी करण्यात आल्याचे समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी सांगितले.
पावसाळी मासेमारी बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करून एलईडी,पर्सेस्सीन पद्धतीने होणारी मासेमारी बंद करून मच्छिमारांचे हित जोपसणाऱ्या उमेदवारांना लोकसभा निवडणुकीत मतदान करावे अशीच हवा कोळीवाड्यात असल्याचे प्रदीप टपके यांनी सांगितले.