मान्सूनचा जोर वाढतोय; अतिवृष्टीची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 02:57 AM2020-06-17T02:57:11+5:302020-06-17T02:57:22+5:30
१८ जून रोजी कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता
मुंबई : मुंबईसह राज्यात दाखल झालेला मान्सून हळूहळू का होईना, जोर धरत आहे. १७ जून रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. १८ जून रोजी कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथील बहुतांश ठिकाणी जलधारा कोसळत असतानाच मंगळवारी सकाळपासून मुंबईतही पावसाने चांगलाच जोर धरला. सकाळी साडेअकरानंतर मात्र त्याचा जोर ओसरला आणि दुपारी कडाक्याचे उन पडले. दरम्यान, मुंबईचा विचार करता बुधवारसह गुरुवारी मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. मुसळधार ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १६ जूनच्या सकाळी आठे वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार, कुलाबा येथे ५२ आणि सांताक्रूझ येथे ३७ मिमी पावसाची नोंद झाली. १६ जूनपर्यंत कुलाबा येथे ३०३ तर सांताक्रूझ येथे २४५ मिमी पावसाची नोंद झाली.
हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मान्सून पश्चिम मध्य प्रदेशच्या, पूर्व उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागात, पूर्व मध्य प्रदेशाच्या बहुतांश भागात, मान्सून दाखल झाला आहे. गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली.