मान्सून : जुलै कोरडा गेला; ६ जिल्हयांत उणे पावसाची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 06:20 PM2020-07-31T18:20:17+5:302020-07-31T18:21:54+5:30
ऑगस्ट आणि सप्टेंबर असे दोन महिने महत्त्वाचे...
मुंबई : उत्तर भारत, महाराष्ट्रातील काही भाग वगळता मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरसाठी पावसाचा जुलै महिना तसा कोरडाच गेला आहे. परिणामी आता ऑगस्ट आणि सप्टेंबर असे पावसाचे दोन महिने मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, या दोन महिन्यात पुरेसा पाऊस झाला नाही तर मात्र मुंबईकरांवर ओढावलेले पाणी कपातीचे संकट आणखी गहिरे होणार आहे. दरम्यान, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून हवामानात बदल होतील; आणि उत्तर कोकणासह दक्षिण कोकणात पाऊस पुन्हा एकदा जोर धरेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हा अंदाज खरा ठरला तर मुंबईकरांना दिलासा मिळेल.
मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाकडील माहितीनुसार, मुंबईत जुलै महिन्यात मान्सून फार काही सक्रीय नव्हता. देशभरात मात्र मान्सून ब-यापैकी सक्रीय होता. देशभरात ब-यापैकी पावसाची नोंद झाली आहे. बिहारसह आसाम येथे पूरसदृश्य स्थितीदेखील निर्माण झाली होती. महाराष्ट्राचा विचार करता मराठवाड्यात आणि विदर्भ येथे चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. शेतक-यासाठी हे सुचिन्ह आहे. येत्या सहा ते सात दिवसांत राज्याच्या पश्चिम किनारी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईला देखील याचा फटका बसेल. प्रत्येक मान्सून हा वेगळा असतो. उर्वरित दोन महिन्यांत मान्सूनच्या हंगामात ब-यापैकी पाऊस होईल, अशी शक्यता आहे. कोकणात पन्नास टक्के एवढया पावसाची नोंद झाली असली तरी राज्यासाठी एवढा पाऊस पुरेसा नाही.
--------------------
१ जूनपासून आतापर्यंतचा पाऊस : पालघरमध्ये उणे २७ टक्के एवढया पावसाची नोंद झाली आहे. सर्वसाधारण येथे १ हजार २६२.३ मिमी पावसाची नोंद होते. मात्र सद्यस्थितीमध्ये ९२० मिमी एवढा पाऊस नोंदविण्यात आला आहे. या खालोखाल सातारा, नंदुरबार, अकोला, गोंदिया आणि गडचिरोली येथे देखील उणे पाऊस नोंदविण्यात आला आहे.
--------------------
उणे पावसाची नोंद टक्क्यांत. उणे म्हणजे कमी पाऊस होय.
पालघर -२७ टक्के
सातारा -२६ टक्के
नंदुरबार -३३ टक्के
अकोला -२१ टक्के
गोंदिया -४३ टक्के
गडचिरोली -२२
--------------------
ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, पुणे, नाशिक, बुलडाणा, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा या जिल्हयांत १९ टक्क्यांपर्यंतच्या पावसाची नोंद झाली आहे.