मान्सून केरळच्या वेशीवर; भारतात आज दाखल होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 01:48 AM2019-06-08T01:48:12+5:302019-06-08T01:48:59+5:30
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे
मुंबई : बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा मान्सून आज अखेर (शनिवारी) केरळमध्ये दाखल होईल, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे. तत्त्पूर्वी मान्सून दाखल होत असतानाच राज्यातील बहुतांश ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळतील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मान्सून शनिवारी केरळात दाखल होणार असला तरी मुंबईत मात्र तो १३ जूननंतरच येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. विदर्भात उष्णतेच्या लाटेची नोंद झाली आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती.
हवामान खात्याचा अंदाज
जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसाची शक्यता आहे.
मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र व दक्षिण कोकणात पाऊस पडेल.नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, परभणी, सोलापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि पुण्यात पाऊस पडेल.
पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशा आणि उत्तर पूर्व बिहारमध्ये पाऊस पडेल.
झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशमध्ये हवामान कोरडे राहील.
केरळ, दक्षिण कर्नाटकमध्ये पावसाची शक्यता आहे.
मुंबईसाठी अंदाज ८ आणि ९ जून : आकाश सामान्यत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३६, २९ अंशाच्या आसपास राहील. मुंबई ३४.९ अंशावर मुंबईचे कमाल तापमान अद्यापही ३४ ते ३५ अंशावर स्थिर आहे. आर्द्रता ६५ टक्क्यांच्या आसपास आहे. मागील तीन दिवसांपासून शहर आणि उपनगरावर ढग दाटून येत आहेत. प्रत्यक्षात सरींचा मात्र पत्ता नाही. सकाळी दाटून येत असलेले ढग दुपारी मात्र विरळ होत आहेत. परिणामी, मुंबईकरांना ‘ताप’दायक सूर्यकिरणांना सामोरे जावे लागत आहे. विशेषत: आर्द्रतेमध्ये नोंदविण्यात येणारे चढउतार मुंबईकरांना घाम फोडत आहेत.
राज्यासाठी अंदाज
८ जून : मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहील. विदर्भासह मराठवाड्यात उष्णतेची लाट येईल.
९ जून : विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहील. काही ठिकाणी उष्णतेची लाट येईल.
१० आणि ११ जून : विदर्भात उष्णतेची लाट येईल.