मान्सून महाराष्ट्रात ८ जून रोजी; आजपासून होणार सरींचा वर्षाव
By पंढरीनाथ कुंभार | Published: May 30, 2020 03:28 AM2020-05-30T03:28:52+5:302020-05-30T06:08:19+5:30
हवामान खात्याचा अंदाज
मुंबई : अवघ्या देशासह राज्याला तापदायक ठरणारा उन्हाळा आता परतीच्या मार्गावर आहे. कारण मान्सूनने आपली आगेकूच सुरू केली असून, १ जून रोजी तो केरळात दाखल होईल. त्यानंतर पुढील अंतर कापत ८ जून रोजी महाराष्ट्रात दाखल होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तर ३० मेपासून महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लागेल, अशीही शक्यता वर्तविली आहे.
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनच्या पुढील प्रवासास पोषक वातावरण निर्माण होत असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. ३१ मे ते १ जून या काळात अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल. हवामानातील या बदलामुळे मान्सून वेगाने पुढे सरकेल. दरम्यान, आजघडीला मान्सून मालदिव, कोमोरिन, बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग, अंदमान समुद्र आणि निकोबार बेट येथे दाखल झाला आहे.
दरम्यान, मराठवाडा, विदर्भ येथील कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. ३० व ३१ मे रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. १ आणि २ जून रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ येथे पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दोन दिवस मुंबई ढगाळ
३० आणि ३१ मे रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३४, २९ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.