'श्री फुड्स' ने अंधेरीत आयोजित केला होता मान्सून मँगो महोत्सव
By मनोहर कुंभेजकर | Published: June 18, 2023 03:13 PM2023-06-18T15:13:56+5:302023-06-18T15:14:42+5:30
बहुधा आंबा महोत्सवात फक्त हापूस आंबा प्रकाशझोतात असतो. परंतू इथे महाराष्ट्र आणि इतर राज्यांतील मिळून २७ विविध प्रकारचे पावसाळी आंबे सादर केले गेले.
मुंबई - साऱ्या जगात आंबा हा फळांचा राजा म्हणून गणला जातो. वर्षातून फक्त एकदाच येणाऱ्या आंब्याला बाजारपेठेत आणि लोकांच्या मनात मानाचे स्थान आहे. फळ महाग असले तरीही रत्नागिरी, देवगड, सिंधुदुर्ग आदी कोकणच्या हापूसला जगभरातून मोठी मागणी असते. आंब्याच्या एक दोन नव्हे तर असंख्य जाती आहेत. यातील प्रत्येक जातीच्या आंब्याच्या चवीत एक आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे. ह्याचं ज्ञान खवय्यांपर्यंत पोहोचवणं आवश्यक व गरजेचे वाटते.
ह्याच आगळ्या वेगळ्या कल्पनेतून 'श्री फुड्स' ने आपल्या अंधेरीतील एक्सपिरियन्स सेंटरमध्ये 'मान्सून मँगो महोत्सव २०२३' आयोजित केला होता. बहुधा आंबा महोत्सवात फक्त हापूस आंबा प्रकाशझोतात असतो. परंतू इथे महाराष्ट्र आणि इतर राज्यांतील मिळून २७ विविध प्रकारचे पावसाळी आंबे सादर केले गेले. यात गुजरातचा वनराज, करंजीयो, गोव्याचा मलगिस, दक्षिणेतील बदामी, मल्लिका तर उत्तरेतील दशेरी आंब्याचा सहभाग होता. गोला, बादशहा यासारख्या पालघरच्या देशी आंब्यांनी लोकांना आकृष्ट केले.
स्थानिकांनी, जाणकारांनी आणि खवय्यांनी विविध जातीच्या आंब्यांचा गोडवा चाखला. रत्नागिरी, देवगड हापूस आंब्याच्या हंगामानंतर तोच जीभेवर रेंगाळणारा गोडवा घेऊन तेथील हापूसचा पल्प सुद्धा प्रदर्शनात ठेवण्यात आला होता. उपस्थितांकडून त्याला भरगोस प्रतिसाद मिळाला. विविध प्रकारच्या स्वादिष्ट, दर्जेदार आंब्याची विक्री वाढवण्याचा आणि लोकांसाठी उपलब्ध करण्याचा 'श्री फुड्स'चा मनोदय आहे.
गेली काही वर्षे श्री फुड्स, नैसर्गिकरीत्या पिकवलेले, कार्बाईड मुक्त आंबे बागायतदारांकडून खरेदी करून मुंबईत विक्री करते. याच धर्तीवर अन्य सिझनल व इतर फळे, ड्राय फ्रूट्स, प्रोसेस्ड फूड आणि किराणा सामान परस्पर मूळ शेतकऱ्यांकडून, बागायतदारांकडून, प्रोसेसरकडून घेऊन ऑनलाईन माध्यमातून विक्री करण्याचा मानस आहे, असे 'श्री फुड्स' चे मिलींद साळवी आणि कौशल शाह यांनी सांगितले.