Join us

मान्सून : मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज तर रायगड, रत्नागिरीला रेड अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 4:14 PM

मुंबईसह राज्यात आता पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देमंगळवारी सकाळी ८.३० ची नोंद (मिमी) सकाळी ८.३० ची नोंद (मिमी) कुलाबा ६.८ सांताक्रूझ २७.८१३ जुलैपर्यंतचा पाऊस कुलाबा १ हजार ६९ मिमी सांताक्रूझ १ हजार १३०.४ मिमीटक्केवारी कुलाबा ४६.६७ सांताक्रूझ ४२.३७

 

मुंबई : मुंबईसह राज्यात आता पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मंगळवारी सकाळपासून मुंबई शहर आणि उपनगरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला आहे. बुधवारीदेखील पावसाचा जोर कायम राहणार असून, यादिवशी मुंबई, ठाणे आणि पालघरला ऑरेंज अलर्ट तर रायगड आणि रत्नागिरील रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. तर रत्नागिरी आणि रायगडमध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. दरम्यान, बुधवारी पुणे जिल्हयातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल, असा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात मंगळवारपासून पावसाचा जोर कायम होता. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत मुंबईत २७ मिलीमीटर एवढया पावसाची नोंद झाली. दुपारी बारा वाजता पावसाने सर्वदूर विश्रांती घेतली. त्यानंतर पावसाचा जोर पुन्हा वाढला. दुपारी ४ वाजेपर्यंत मुंबईत बहुतांश ठिकाणी ४० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, मध्य मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात पडलेल्या पावसाने काही काळ का होईना मुंबईकरांना धडकी भरली होती. ४ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. ११ ठिकाणी झाडे कोसळली. दरम्यान,  महाराष्ट्राच्या समुद्र किनारी ताशी ४० किमी वेगाने वारे वाहतील. समुद्र खवळलेला राहील. परिणामी मच्छिमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.   

 

 

बुधवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हयांत जोरदार पाऊस पडेल. गुरुवारी संपुर्ण कोकणात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. त्यानंतर पावसाचा जोर ओसरेल.

- शुभांगी भुते, शास्त्रज्ञ, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग

टॅग्स :मानसून स्पेशलपाऊसमुंबईमहाराष्ट्रठाणेपालघररायगडरत्नागिरीसिंधुदुर्गपुणे