मुंबई : खोल दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘अशोबा’ चक्रीवादळ ओमानच्या दिशेने पुढे सरकत असले, तरीदेखील या वादळाचा महाराष्ट्रसह गुजरातच्या मान्सूनवर होणारा विपरीत परिणाम कायम आहे. वादळाचा परिणाम म्हणून दोन्ही राज्यांच्या किनारपट्टीवर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, वादळाने वातावरणात झालेल्या बदलामुळे मुंबईत दाखल होणारा मान्सूनही लांबणीवर पडण्याचा अंदाज आहे.मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ११.३० वाजता ‘अशोबा’ चक्रीवादळचा केंद्रबिंदू मुंबईच्या नैर्ऋत्यला ५९० किलोमीटर अंतरावर होता. या चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ पुढच्या ३६ तासांत उत्तर आणि वायव्य दिशांना सरकरण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पुढील २४ तासांत महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत ताशी ७०-८० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. त्यापुढील २४ तासांत या वाऱ्याचा वेग आणखी वाढून तो ताशी ९०-१०० किलोमीटरवर जाईल. महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत समुद्र अतिशय खवळलेला असेल. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. शिवाय जे मच्छीमार समुद्रावर गेलेले आहेत त्यांनी तत्काळ किनाऱ्याकडे परतावे, असे आवाहनदेखील करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)मुंबईत मान्सून विलंबानेतळकोकणात दाखल झालेल्या मान्सूनवर ‘अशोबा’ चक्रीवादळाचा प्रभाव आहे. परिणामी मान्सूनचा पुढील प्रवास लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. सोमवारी तळकोकणात दाखल झालेला मान्सून ४८ तासांत मुंबईत दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. प्रत्यक्षात चक्रीवादळासह वातावरणातील बदलामुळे मान्सून मुंबईतील नक्की कधी दाखल होईल; याबाबत आता हवामान खातेही सांशक असून, सद्यस्थितीमध्ये मान्सूनच्या प्रवासाचे मॉनेटरिंग सुरु असल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.
‘अशोबा’मुळे मान्सून अधांतरी
By admin | Published: June 10, 2015 3:02 AM