सचिन लुंगसे
मुंबई : पावसाचा पहिला महिना म्हणजेच जून संपतानाच मान्सूनने देश व्यापल्यानंतरही मुंबई उपनगर, पालघर, अकोला आणि यवतमाळ हे चार जिल्हे अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. १ ते २६ जूनदरम्यान आकडेवारीनुसार, मुंबईच्या उपनगरात सरासरीच्या तुलनेत उणे २१ टक्के पावसाची नोंद झाली असून, पालघरमध्ये उणे २७ टक्के , अकोल्यात उणे ३९ टक्के आणि यवतमाळमध्ये उणे ३१ टक्के पावसाची नोंद झालीे.
संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता येथे या काळात १६७.५ मिली. पावसाची नोंद होते. मात्र, प्रत्यक्षात २१३.३ मिलीमीटर पाऊस पडला असून, सरासरीच्या तुलनेत २७ टक्के अधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडील आकडेवारीनुसार, अहमदनगर येथे सरासरीच्या तुलनेत १०५ टक्के, औरंगाबाद ८७, बीड ७३, सोलापूर ८३ आणि लातूर येथे सरासरीच्या तुलनेत ७१ टक्के एवढ्या अधिकच्या पावसाची नोंद झाली.
हवामानशास्त्र उपविभागीय नोंदीनुसार, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ६० टक्क्यांपर्यंत मान्सून नोंदविण्यात आला. मध्य महाराष्ट्रात १९३.७ मिमी. पावसाची नोंद झाली असून, हा पाऊस सरासरीच्या तुलनेत ५२ टक्के अधिक आहे. मराठवाड्याचा विचार केल्यास येथे १७३ मिमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. सरासरीच्या तुलनेत तो ५० टक्के अधिक आहे. तर, कोकण-गोवा विभागात ६४६.९ मिमी. पावसाची नोंद झाली असून, सरासरीच्या तुलनेत तो १७ टक्के अधिक बरसला आहे. विदर्भात १४३ मिमी. पाऊस पडला असून सरासरीच्या तुलनेत ही नोंद ६ टक्के जास्त आहे. दरम्यान, मुंबई शहर, ठाणे, रायगड, सातारा, नंदुरबार, नांदेड, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांत आतापर्यंत सर्वसाधारण पावसाची नोंद करण्यात आली आहे.