मान्सूनपूर्व पावसाचा ‘ताप’, मध्य भारतात उष्णतेची लाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 06:03 AM2018-05-15T06:03:21+5:302018-05-15T06:03:21+5:30
मान्सूनपूर्व पावसाचे संकेत मिळत असतानाच देशासह राज्य आणि मुंबईमधील वातावरण ढवळून निघाले आहे. उत्तर भारतात वाळूच्या वादळासह पावसाने थैमान घातले आहे.
मुंबई : मान्सूनपूर्व पावसाचे संकेत मिळत असतानाच देशासह राज्य आणि मुंबईमधील वातावरण ढवळून निघाले आहे. उत्तर भारतात वाळूच्या वादळासह पावसाने थैमान घातले आहे. मध्य भारतात काही ठिकाणी उष्णतेची लाट आहे. दक्षिण भारतातही पावसाने जोरदार स्वरूप धारण केले आहे. राज्यात विदर्भात उष्णतेच्या लाटेने थैमान घातले असून, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाच्या सरी कोसळत आहेत. मुंबईतही नोंदविण्यात येत असलेल्या ढगाळ वातावरणामुळे हवामानात उल्लेखनीय बदल होत असून, येत्या ७२ तासांसाठी सर्वत्र वातावरणात बदल नोंदविण्यात येतील, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे.
जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडात पावसाची शक्यता आहे. पंजाब आणि हरयाणामध्ये पावसाचे प्रमाण कमी असेल. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात मेघगर्जना होईल. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड येथे धुळीचे वादळ कायम राहील, शिवाय पावसाचा शिडकावा होईल. पश्चिम बंगाल आणि ओरिसा येथे मान्सूनपूर्व पावसाचे वातावरण राहील. नागालँड, मिझोराम, मणिपूर आणि त्रिपुरामध्ये जोरदार पाऊस पडेल. अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळतील. तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि केरळ येथेही पावसाच्या सरी कोसळतील. मध्य प्रदेश, छत्तीसगढ, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही पावसाच्या सरी कोसळतील. मध्य प्रदेशात उष्णतेची लाट येईल. गुजरात आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या तापमानात वाढ नोंदविण्यात येईल.
मागील २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे.
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.
>उष्णतेच्या लाटेचा इशारा
१५ मे : विदर्भात उष्णतेची लाट येईल.
१६ ते १८ मे : विदर्भात उष्णतेची लाट येईल.
>मुंबई ढगाळ राहणार
१५ ते १६ मे दरम्यान मुंबईमधील आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २६ अंशाच्या आसपास राहील.
>पावसाचा इशारा
१५ ते १६ मे : विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल.
१७ ते १८ मे : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
>हैदराबादेत वाऱ्याचा जोर
दिल्लीत हवामान उष्ण राहील. मेघगर्जना होईल.
मुंबईमध्ये हवामान कोरडे आणि उष्ण राहील.
कोलकातामध्ये पावसाची शक्यता आहे.
बंगळुरूमध्ये पावसाची शक्यता आहे.
चेन्नईमध्ये पावसाची शक्यता आहे.
हैदराबाद येथे वेगाने वारे वाहतील, शिवाय पावसाची शक्यता आहे.