चकवा देणारा मान्सून आज बरसणार! मराठवाड्यात अनेक ठिकाणी झाला पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 08:27 AM2020-06-11T08:27:40+5:302020-06-11T08:28:07+5:30
मराठवाड्यात अनेक ठिकाणी झाला पाऊस
मुंबई/पुणे : चक्रीवादळामुळे वाटचालीची गती मंदावल्याने गेल्या तीन दिवसांपासून चकवा देणारा मान्सून येत्या २४ तासांत महाराष्ट्रात दाखल होईल, अशी आनंदवार्ता हवामान विभागाने दिली आहे. बुधवारी मराठवाड्यात लातूर, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पाऊस झाला असला तरी या मान्सूनपूर्व सरी आहेत. मºहाटी मुलुखात दाखल झाल्यानंतर गोव्यासह दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मान्सूनच्या आनंदसरींचा प्रथम वर्षाव होईल आणि त्यानंतर तो टप्प्याटप्प्याने राज्य व्यापेल, असाही अंदाज आहे.
बंगालच्या उपसागरातील अनुकूल हवामानामुळे मान्सूनचा पुढील प्रवास वेगाने सुरू असून, बुधवारी तामिळनाडूच्या उर्वरित भागात, पश्चिम मध्य व उत्तर बंगालच्या आणखी काही भागात, त्रिपुरा व मिझोरामच्या काही भागात दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामानशास्त्र विभागाने केली. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओरिसा, छत्तीसगढ, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. २४ तासांत दक्षिण कोकण गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात दाखल होणारा मान्सून, त्यापुढील दोन ते तीन दिवसांत म्हणजे १२ ते १३ जूनच्या आसपास मुंबईत दाखल होईल, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी बरसणाऱ्या मान्सूनपूर्व सरींमुळे मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात कमाल तापमान घटले आहे. गेल्या २४ तासांत चंद्रपूर येथे राज्यातील सर्वाधिक ४१.५ अंश सेल्शिअस तापमानाची नोंद झाली.
अद्याप मान्सून महाराष्ट्रात दाखल झालेला नाही. गुरुवारी किंवा शुक्रवारी कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या काही भागात तो दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. तसे झाल्यास नंतरच्या ४८ तासांत तो महाराष्ट्र व्यापेल. -कृष्णानंद होसाळीकर, उपमहासंचालक, मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभाग