मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सूनने आगमनाच्या पहिल्याच दिवशी मुंबापुरीला दिलेला तडाखा अजूनही कायम आहे. दरम्यान, येत्या रविवारी मुंबई आणि ठाण्यात अतिवृष्टी होईल, असा इशाराच भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला. विशेषत: संपूर्ण कोकण किनारीपट्टीच्या भागात पुढील काही दिवस जलधारा रुद्रावतार धारण करणार असून, गरज असेल तरच मुंबई आणि ठाणेवासीयांनाे घराबाहेर पडा; अन्यथा आपला वीकेंड घरीच साजरा करा, असे आवाहनही हवामान खात्याने केले.
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक कृष्णानंद होसाळीकर यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्याचा पश्चिमेकडील प्रवास गृहीत धरून पश्चिम किनारपट्टीच्या भागावर म्हणजे कोकण किनाऱ्यावर पुढील चार ते पाच अति तीव्र मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिम किनारी जोरदार वारे वाहतील. याचा परिणाम म्हणून मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी आणि रायगडला पुढील ३ दिवस रेड अलर्ट आहे. मुंबई आणि ठाण्याला रविवारी रेड अलर्ट देण्यात आला आहे. पावसाचा वेग वाढताना दिसेल. मुंबईकर, ठाणेकर कृपया काळजी घ्या. गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे ते म्हणाले.
१३ व १४ जून या दोन दिवसांच्या कालावधीदरम्यान मुंबई शहर व उपनगरातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर समुद्र किनारे व समुद्र किनाऱ्यांलगतचा परिसर इत्यादी ठिकाणी जाणे नागरिकांनी टाळावे, असे आवाहन मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात आले आहे.
मिठी नदीजवळील परिसरात पथक तैनातमिठी नदीच्या पातळीत वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यास क्रांतीनगर व इतर परिसरातील नागरिकांच्या तात्पुरत्या स्थलांतराची व्यवस्था करण्याच्या सूचना सहायक आयुक्त, एल विभाग यांना देण्यात आली असून, त्वरित मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाची एक तुकडी तेथे तैनात करण्यात आली आहे. शिक्षण अधिकाऱ्यांना महापालिकेच्या २४ विभागांमधील तात्पुरते निवारे म्हणून निश्चित केलेल्या महापालिका शाळा त्वरित मदतीकरिता सुसज्ज आहेत.
यंत्रणा सज्जविभागीय नियंत्रण कक्ष व इतर सर्व नियंत्रण कक्षांना हाय अलर्ट देण्यात आला असून, सर्व यंत्रणा सुसज्ज व सतर्क आहेत. सर्व विभागीय नियंत्रण कक्ष हे आवश्यक मनुष्यबळ व साधनसामग्रीसह सुसज्ज आहेत. पर्जन्य जलवाहिन्या विभागाची ६ उदंचन केंद्रे व पाण्याचा उपसा करणारे उदंचन संच कार्यरत असल्याची खातरजमा करण्यात आली आहे. अग्निशमन दलाची पूर व बचाव पथके आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामग्रीसह ६ प्रादेशिक समादेशन केंद्रांवर तैनात आहेत.राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक हे आणीबाणी परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदतीकरिता तत्पर आहे. भारतीय तटरक्षक दल, नौसेना मदतीकरिता तत्पर आहेत. बेस्ट (बीईएसटी) (वाहतूक व विद्युत) आणि अदानी एनर्जी यांना सर्व सबस्टेशन हाय अलर्टवर असून, पथके सुसज्ज व सतर्क आहेत. आणीबाणी मदत यंत्रणांपैकी पोलीस, अग्निशमन दल, वाहतूक पोलीस, बीईएसटी (वाहतूक व विद्युत), शिक्षण खाते, आरोग्य खाते, परिवहन आयुक्त यांचे समन्वय अधिकारी महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षात उपस्थित असतील.