मान्सून दिलासा : वारा कायम तर पावसाची विश्रांती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:06 AM2021-08-01T04:06:13+5:302021-08-01T04:06:13+5:30
मुंबई : गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य ...
मुंबई : गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली असून, १ ऑगस्ट रोजी कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल, तर किनारी भागात सोसाट्याचा वारा वाहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ आणि २ ऑगस्ट रोजी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल. ३ आणि ४ ऑगस्ट रोजी कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. उत्तर महाराष्ट्र किनारी भागात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. अधून-मधून कोसळणाऱ्या सरी वगळल्या तर मुंबईत पावसाने बऱ्यापैकी उघडीप घेतली आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता काही काळ आणि सायंकाळी ७ वाजता काही काळ उपनगरात पावसाने हजेरी लावली. मात्र, हे प्रमाण फार कमी होते.