आठवडाभर असणार परतीच्या पावसाचा मुक्काम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 04:31 AM2019-10-14T04:31:51+5:302019-10-14T04:33:03+5:30
हवामान विभाग : काही भागातून माघार पूर्ण
पुणे : नैऋत्य मोसमी पाऊस उत्तर अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेश व छत्तीसगडच्या आणखी काही भागातून माघारी परतला आहे़ महाराष्ट्रात मात्र अजून आठवडाभर परतीच्या पावसाचा मुक्काम असणार आहे़ येत्या १६ व १७ आॅक्टोबर रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे़
गेल्या २४ तासात कोकण, गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़ मान्सूनचा कर्नाटकातील किनारपट्टी भागातील जोर कमी झाला
असून सध्या तो केरळमध्ये सक्रीय आहे़ रविवारी दिवसभरात महाबळेश्वर ११, सातारा २०, सोलापूर ०़७, पुणे ०़८ मिमी पावसाची नोंद झाली आहे़
१४ व १५ आॅक्टोबर रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़ मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़ १६ व १७ आॅक्टोबर रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़
मुंबई,ठाण्यात आज गडगडाटासह कोसळणार
१४ आॅक्टोबर रोजी ठाणे, मुंबई, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे़ रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४ ते १७ आॅक्टोबर दरम्यान गडगडाटासह पावसाची शक्यता आहे़
दि. १६ व १७ आॅक्टोबर रोजी पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे़ तर १७ आॅक्टोबर रोजी जालना, परभणी जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे़