Join us

महिनाभराच्या विलंबानंतर मान्सून परतला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 6:28 AM

आता मुंबईकरांना तडाखा आॅक्टोबर हीटचा : देशभरात चार महिन्यांत ११० टक्के पावसाची नोंद

मुंबई : राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू केलेल्या मान्सूनने सोमवारी म्हणजे १४ आॅक्टोबर रोजी मुंबईतूनही अखेर माघार घेतली आहे. परतीच्या पावसाने मुंबईतून आपला प्रवास सुरू केल्याने, आता आॅक्टोबर हीटचा तडाखा मुंबईकरांना आणखी बसणार असून, उत्तरोत्तर यात आणखी वाढच होणार आहे. मुंबईची आर्द्रता ७८ टक्क्यांच्या आसपास नोंदविण्यात येत असून, आॅक्टोबर हीटमुळे उन्हाचा तडाखाही वाढत आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, राजस्थान, पंजाब, हरयाणासह लगतच्या राज्यातून मान्सूनने आपला परतीचा प्रवास सुरू केला होता. सर्वसाधारणपणे १ सप्टेंबर रोजी मान्सून परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो आणि १ आॅक्टोबर रोजी महाराष्ट्रातून माघारी फिरतो. मात्र, या वेळी मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला तब्बल एक महिना विलंब झाला.मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला ९ आॅक्टोबर रोजी राजस्थानातून सुरुवात झाली. जून, जुलै, आॅगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांत मान्सूनने देशासह महाराष्ट्र आणि मुंबईला चांगलेच झोडपून काढले. देशभरात चार महिन्यांत तब्बल ११० टक्के पावसाची नोंद झाली. महाराष्ट्रात ३२ टक्के अधिकचा पाऊस नोंदविण्यात आला. १३ आॅक्टोबर रोजी परतीचा मान्सून मध्य महाराष्ट्राच्या सीमेवर दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला हवामान अनुकूल असल्याने, त्याने १४ आॅक्टोबर रोजी मुंबईतूनही माघार घेतली.

परतीच्या तारखांमध्ये फरक; स्कायमेटचा निष्कर्षच्मान्सूनचा हंगाम हा जून ते सप्टेंबर या चार महिन्यांचा आहे. जून महिन्यात मान्सूनला सुरुवात होते. सप्टेंबर महिना मान्सूनच्या परतीचा महिना म्हणून ओळखला जातो. मान्सूनचा हंगाम सुरू होण्याच्या तारखेत फार मोठी तफावत आढळत नाही. मात्र, परतीच्या तारखांमध्ये मोठी तफावत आढळते, असा निष्कर्ष स्कायमेटचा आहे.असे आहेत परतीचे मापदंडसलग ५ दिवस पावसाची अनुपस्थिती, वाऱ्यात बदल, प्रतिचक्रवात तयार होणे, आर्द्रता कमी होणे, तापमानात झालेली वाढ, कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सून सक्रिय.अंदाज खरा ठरलामान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर मुंबईतून मान्सून १४ आॅक्टोबर रोजी परतीचा प्रवास सुरू करेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. महत्त्वाचे म्हणजे हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरला. मान्सूनने मुंबईतून माघार घेतली आहे. दरम्यान, तामिळनाडूमधून आॅक्टोबरच्या उत्तरार्धात मान्सून माघार घेणार आहे.

टॅग्स :उष्माघात