मान्सून मुंबईसह महाराष्ट्रातून परतला; आॅक्टोबर हीटचा तडाखा वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2018 03:24 AM2018-10-07T03:24:48+5:302018-10-07T03:25:21+5:30
उत्तर भारतातून परतीच्या प्रवासाला निघालेल्या मान्सूनने शनिवारी अखेर मुंबईसह महाराष्ट्रातूनही माघार घेतली; तशी घोषणाच भारतीय हवामानशास्त्र विभागाने केली.
मुंबई : उत्तर भारतातून परतीच्या प्रवासाला निघालेल्या मान्सूनने शनिवारी अखेर मुंबईसहमहाराष्ट्रातूनही माघार घेतली; तशी घोषणाच भारतीय हवामानशास्त्र विभागाने केली.
दक्षिण कोकणातून परतीचा प्रवास करत पुढे सरकलेला मान्सून कर्नाटकात आहे. तर दुसरीकडे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर येत्या २४ तासांत चक्रिवादळात होण्याची शक्यता आहे. परिणामी, समुद्र खवळलेला राहणार असल्याकारणाने मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात उतरू नये, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे मान्सूनने आता काढता पाय घेतल्याने आॅक्टोबर हीटचा तडाखा आणखी वाढणार असून, नागरिक उकाड्यासह उन्हाने त्रस्त होणार आहेत.
भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नेर्ऋत्य मौसमी पाऊस उत्तर बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग, छत्तीसगड, महाराष्ट्र, संपूर्ण तेलंगणा, मध्य अरबी समुद्राचा बहुतांश भाग, आंध्र प्रदेशचा किनारा, मध्य अरबी समुद्र आणि कर्नाटकाच्या काही भागांतून माघारी परतला आहे. गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. विदर्भात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. ७ ते १० आॅक्टोबरदरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भात हवामान कोरडे राहील. रविवारसह सोमवारी मुंबई शहर, उपनगरावरील आकाश निरभ्र राहील. मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३७, २४ अंशाच्या आसपास राहील.
मुंबई शहर आणि उपनगराचा विचार करता येथे आॅक्टोबर हीटचा तडाखा दिवसागणिक वाढत आहे. मुंबईचे कमाल तापमान ३४ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. शिवाय आर्द्रताही ८९ टक्क्यांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. शुक्रवारी दुपारी मुंबईमधील वातावरण ढगाळ नोंदविण्यात आले होते. शिवाय शनिवारी मुंबईत हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. प्रत्यक्षात मात्र शनिवारी मान्सूननेच मुंबईसह महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. मान्सूनच्या माघारीनंतर उन्हाचा कडाका आणि उकाड्यात वाढ नोंदविण्यात येणार आहे. हवामानातील बदलामुळे त्यांना त्रास होणार असून, उकाड्याने नागरिकांचा घाम निघणार आहे.
६ आॅक्टोबर रोजीचे कमाल तापमान
वर्ष कमाल तापमान
२००८ ३७
२००९ ३६.८
२०१० ३६
२०११ ३६.३
२०१२ ३५.९
२०१३ ३६.५
२०१४ ३७.२
२०१५ ३८.६
२०१६ ३५.५
२०१७ ३६.६
(अंश सेल्सिेयस)