मुंबईत मान्सून 'वाऱ्यावर' स्वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:06 AM2021-07-23T04:06:07+5:302021-07-23T04:06:07+5:30
मुंबई : कोकणात सर्वत्र मान्सूनचा धिंगाणा सुरू असून, मुंबईत देखील कमी अधिक फरकाने गुरुवारी पावसाने मारा कायम ठेवला. मुंबई ...
मुंबई : कोकणात सर्वत्र मान्सूनचा धिंगाणा सुरू असून, मुंबईत देखील कमी अधिक फरकाने गुरुवारी पावसाने मारा कायम ठेवला. मुंबई शहराच्या तुलनेत पश्चिम आणि पूर्व उपनगरात वाऱ्यावर स्वार झालेला मान्सून वेगाने कोसळत असल्याने मुंबईकरांना गुरुवारीदेखील भरलेली धडकी कायमच होती.
गुरुवारी पहाटे पावसाने हजेरी लावली. सकाळी अकरा वाजेपर्यंत मुंबईत तुरळक ठिकाणी पावसाची दमदार हजेरी लागत होती, तर काही ठिकाणी तो विश्रांतीवर होता. दक्षिण मुंबई आणि मध्य मुंबईच्या तुलनेत उपनगरात पावसाचा जोर सकाळी कायम होता. रिमझिम का होईना पाऊस आपले अस्तित्व जाणवून देत होता. उपनगरात सकाळी तुरळक ठिकाणी वेगाने वारे वाहत होते.
काही ठिकाणी पाऊस कमी, पण वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने नागरिकांना धडकी भरत होती. बहुतांशी बाजारपेठात सकाळी हीच स्थिती होती. पावसाने ब्रेक घेतला की बाजार पुन्हा फुलत होता. सकाळी पावसासह वाऱ्याचा खेळ सुरू असतानाच दुपारी मात्र बराचवेळ विश्रांतीवर गेलेला पाऊस सूर्यास्ताला दाखल झाला. विशेषत: वेगाने वाहणारे वारे मुंबईकरांना धडकी भरवीत होते आणि त्यात पावसाचे टपोरे थेंब नागरिकांना झोडपून काढत होते. गुरुवारी दिवसभर हीच स्थिती कायम असतानाच आज, शुक्रवारीदेखील मुंबईत याच पद्धतीने पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे शुक्रवारी मुंबईकरांची पावसापासून सुटका होणार नसल्याचे चित्र आहे.
----------------
मान्सून मीटर (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये)
कुलाबा ९
नरिमन पॉइंट ७
मलबार हिल ७
मांडवी ७
मेमनवाडा ५
ताडदेव ७
हाजीअली ६
लोअर परळ ११
वरळी ७
दादर ५
माटुंगा ८
धारावी ६
वांद्रे १३
बीकेसी ६
चेंबूर १०
कुर्ला २४
जुहू ८
विक्रोळी ३५
मरोळ १४
सांताक्रुझ १८
अंधेरी १७
वर्सोवा १७
राम मंदिर २३
मालवणी ११
कांदिवली ७
बोरीवली १३
दहिसर २०
कांजुरमार्ग २६
मुलुंड ३०