मान्सून स्कूटर रॅली : सय्यद आसिफ अलीचे विक्रमी विजेतेपद
By admin | Published: July 10, 2016 10:57 PM2016-07-10T22:57:25+5:302016-07-10T22:57:25+5:30
अनुभवी आणि विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या टीव्हीएस संघाच्या सय्यद आसिफ अली याने आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना मान्सून स्कूटर रॅली स्पर्धेचे विक्रमी पाचव्यांदा विजेतेपद पटकावले
मुंबई : अनुभवी आणि विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या टीव्हीएस संघाच्या सय्यद आसिफ अली याने आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना मान्सून स्कूटर रॅली स्पर्धेचे विक्रमी पाचव्यांदा विजेतेपद पटकावले. आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर सय्यदने वेग आणि संतुलन यांचा ताळमेळ साधत बाजी मारली.
देशभरातील स्कूटर रायडर्समध्ये लोकप्रिय असलेल्या या २७व्या रॅली स्पर्धेत बंगळुरुच्या सय्यदने ह्यक्लास एफएसजीह्णह्ण (१६०सीसी, ४ स्ट्रोक) या गटात ३२.४३ सेकंदाची वेळ देत बाजी मारली. हीच वेळ संपुर्ण स्पर्धेत सर्वोत्तम ठरताना सय्यदने सर्वांगिण जेतेपद निश्चित करीत स्पर्धेवर कब्जा केला.
त्याचवेळी सय्यदला प्रामुख्याने टक्कर दिली ती, टीम महिंद्राच्या शमीम खान याने. शमीमनेदेखील क्लास एफएसजी गटात नोंदवलेली ३३:३६ सेकंदाची वेळ स्पर्धेतील दुसरी सर्वोत्तम वेळ ठरली. यामुळे त्याने उपविजेतेपद पटकावले. तर याच गटात सीएट संघाच्या एरीमल शेखरन याने ३४:१८ सेकंदाची नोंदवलेली वेळ स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम वेळ ठरली. विशेष म्हणजे वैयक्तिकरीत्या सहभागी झालेल्या शेषराज यादव याने सर्वांचे लक्ष वेधताना ३५.५४ सेकंदाची वेळ नोंदवून चौथा क्रमांक पटकावला.
दरम्यान, महिलांमध्ये सीएट संघाची मुंबईकर रायडर निधी शुक्ला हिने ४५.२० सेकंदाची वेळ नोंदवत वर्चस्व राखले. गतवर्षी देखील वर्चस्व राखल्यानंतर यंदाही बाजी मारत निधीने आपला दबदबा कायम राखला. तर माजी विजेत्या सीएट संघाच्या मनजीत सिंग बसनने क्लास एस२ गटात बाजी मारताना ३७:१४ सेकंदाची विजयी वेळ नोंदवली.
...........................................
इतर विजेते :
सर्वोत्तम मुंबई रायडर : जगजीत सिंग थेठी
सर्वोत्तम नवी मुंबई व ठाणे रायडर : रथीश नायर
सर्वोत्तम नाशिक रायडर : निलेश ठाकरे
सर्वोत्तम भोपाळ रायडर : मोहम्मद अली खान
सर्वोत्तम पुणे रायडर : लोकेश भोसले
सर्वोत्तम बंगळुरु रायडर : मधू एस.
सर्वोत्तम देहराडून रायडर : रिशभ रावत
सर्वोत्तम औरंगाबाद रायडर : आकाश सातपुते
सर्वोत्तम जोधपूर रायडर : अभिषेक दिवाकर
सर्वोत्तम रायगड रायडर : अजिंक्य कुलकर्णी
..............................