Join us

पावसाळापूर्व कामे टीकास्त्रांनंतर वेगाने

By admin | Published: May 15, 2017 1:00 AM

मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील नालेसफाईची कामे वेगाने होत नसल्याच्या कारणास्तव विविध स्तरांतून महापालिका प्रशासनावर टीकास्त्र उगारण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील नालेसफाईची कामे वेगाने होत नसल्याच्या कारणास्तव विविध स्तरांतून महापालिका प्रशासनावर टीकास्त्र उगारण्यात आले. विशेष म्हणजे राजकीय पक्षांसह स्वंयसेवा संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही पालिका प्रशासनाकडून होत असलेली नालेसफाई समाधानकारक होत नसल्याची टीका केली. सर्वच स्तरांतून झालेल्या या जहरी टीकेनंतर प्रशासनाने वेगाने नालेसफाईच्या कामांसह पंपिंग स्टेशनच्या कामांना प्राधान्य दिले आहे. महत्त्वाचे म्हणजे खुद्द महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी पंपिंग स्टेशनसह नालेसफाईच्या कामांची पाहणी केली असून, सर्व कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसार करण्याचे आदेशही संबंधित अधिकारी वर्गाला दिले आहेत.महापालिका क्षेत्रातील पावसाळापूर्व कामे सध्या प्रगतिपथावर आहेत, असा दावा प्रशासनाने केला आहे. या कामांचा दैनंदिन आढावा आयुक्तांच्या स्तरावर घेतला जात आहे. याच अंतर्गत अजय मेहता यांनी पश्चिम उपनगरातील ४ विभागांतील पावसाळापूर्व कामांची पाहणी केली. यामध्ये प्रामुख्याने रस्ते व नालेसफाई कामांची पाहणी करण्यात आली. तसेच सांताक्रूझ पश्चिम परिसरातील गजधरबंध उदंचन केंद्राच्या उभारणीचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. या पंपिंग स्टेशनची कार्यान्वयनपूर्व तांत्रिक चाचणी या महिन्याअखेरपर्यंत घेण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित अधिकारी वर्गाला दिले आहेत. तसेच अंधेरी पश्चिमेतील इर्ला पंपिंग स्टेशनचीही आयुक्तांनी तांत्रिक चाचणी घेत तेथील पावसाळापूर्व तयारीची पाहणी केली आहे.५ ठिकाणी उदंचन केंद्रे कार्यान्वितपावसाच्या पाण्याचा अधिक वेगाने निचरा व्हावा, या दृष्टीने उदंचन केंद्रांची आवश्यकता असते.त्यानुसार महापालिकेद्वारे आतापर्यंत हाजीअली, लव्हग्रोव्ह (वरळी), क्लिव्हलँड बंदर (वरळी), ब्रिटानिया (रे रोड, भायखळा/माझगाव) व इर्ला (अंधेरी) या ५ ठिकाणी उंदचन केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत.अंधेरी पश्चिमेतील मोरागाव परिसरातील इर्ला पंपिंग स्टेशनला आयुक्तांनी भेट दिली. शिवाय तेथील पावसाळापूर्व तयारीची पाहणी केली. या ठिकाणी डिझेलसह इतर आवश्यक साधनसामग्री असल्याचीही पाहणी करण्यात आली. सद्य:स्थितीमध्ये कार्यान्वित असलेल्या ५ ठिकाणांच्या उदंचन केंद्रांच्या व्यतिरिक्त नव्याने उभारण्यात येत असलेल्या सांताक्रूझ पश्चिम परिसरातील गजधरबंध उदंचन केंद्राच्या उभारणीचे काम आता अंतिम टप्प्यात आहे.या उभारणी कामांची पाहणी करताना या पंपिंग स्टेशनची कार्यान्वयनपूर्व तांत्रिक चाचणी या महिन्याअखेरपर्यंत घेण्याचे आदेश अभियांत्रिकी सेवा व प्रकल्पांचे प्रभारी संचालक तथा पर्जन्य जलवाहिन्या खात्याचे प्रमुख अभियंता लक्ष्मण व्हटकर यांना देण्यात आले आहेत. कुठे होते पाहणी?एच पूर्व, एच पश्चिम, के पूर्व व के पश्चिम या विभागांतील नालेसफाई व रस्ते कामांचीही पाहणी करण्यात आली.नालेसफाईची सर्व कामे ही ठरलेल्या वेळापत्रकानुसार व सुयोग्य प्रकारे पूर्ण करावीत, असे आदेश देण्यात आले आहेत.