मुंबई : राज्याचे पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्याबाबत सरकारच्या हालचाली सुरू आहेत. चालू अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ मार्च रोजी संपत आहे. त्यादिवशी पुढचे अधिवेशन कोठे होणार याची तारीख जाहीर करावी लागते. त्यासाठी संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट हे विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटून नागपूर कसे योग्य राहील हे पटवून देत आहे.याबाबत लोकमतशी बोलताना बापट म्हणाले, डिसेंबर २०१७ मध्ये नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्यावेळीच ही चर्चा झाली होती. त्यावेळी तो विषय निघाला होता. त्यानुसारच पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्याविषयीची चर्चा सुरु झाली आहे. आपण सर्वांशी बोलत आहोत. मुंबईत सध्या विकासाची कामे जोरात आहेत. त्यामुळे वाहतुकीचे प्रश्न आहेतच. शिवाय मनोरा आमदार निवासाचे पाडकाम देखील हे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले की सुरु करावे लागणार आहे. त्यामुळे मुंबईत आमदारांची अडचण होऊ नये अशी आमची इच्छा आहे. शिवाय पावसाळी अधिवेशन दोन आठवड्याचेच असते असेही बापट म्हणाले.याबद्दल सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला ते म्हणाले, हा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत होणे अपेक्षित आहे. संसदीय मंत्री सगळ्यांशी बोलत आहेत हे चांगले आहे, पण सगळ्यांची जी मतं असतील ती कामकाज सल्लागार समितीत येतील, त्यानंतरच यावर निर्णय होईल. आपले मत आपण त्या बैठकीतच सांगू असेही निंबाळकर म्हणाले.अध्यक्षांच्या हक्कभंगावर आज काय होणार?विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावरील अविश्वास ठराव देऊन १४ दिवस सोमवारी पूर्ण झाले. नियमानुसार तो ठराव अध्यक्षांनी वाचून दाखवायचा असतो व त्यावर विरोधकांकडून २९ सदस्यांनी सभागृहात उभे राहून त्याच्या बाजूने आपले मत द्यायचे असते. अध्यक्षांनी ठरावाचे वाचन केल्यानंतर सात दिवसाच्याआत त्यावर निर्णय घेणे अपेक्षीत असते. पण अध्यक्षांनी तो ठराव कधी वाचायचा हे ठरवायचे असाही नियमात उल्लेख असल्याचे सांगण्यात आले. विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्टÑवादीचे गटनेते जयंत पाटील यांच्यासह विरोधकांची याबद्दल सोमवारी बैठक झाली. आता मंगळवारी अध्यक्ष कोणती भूमिका घेतात हे पहाणे महत्वाचे ठरेल.
पावसाळी अधिवेशन नागपूरला? कामकाज सल्लागार समितीत होणार निर्णय
By अतुल कुलकर्णी | Published: March 20, 2018 12:00 AM