Join us  

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून; मंत्रिमंडळाने राज्यपालांना केली शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2024 5:40 AM

लोकसभेच्या आचारसंहितेनंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक गुरुवारी पार पडली.

मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या २७ जूनपासून सुरू होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने तशी शिफारस गुरुवारी राज्यपालांना पाठवली आहे. यापूर्वी १० जूनपासून हे अधिवेशन सुरू होणार होते. मात्र, लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि त्यानंतरच्या इतर घडामोडी, तसेच विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेता, हे अधिवेशन २७ जूनपासून घेण्याबाबतची शिफारस मंत्रिमंडळाने केली आहे. लोकसभेच्या आचारसंहितेनंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक गुरुवारी पार पडली.

लोकसभेनंतर आता विधान परिषद निवडणुकीची आचारसंहितालोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारीअखेरीस राज्याचे अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले होते. अधिवेशन संस्थगित करताना पुढील पावसाळी अधिवेशन १० जून रोजी होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, लोकसभा निवडणूक संपली असली तरी २६ जून रोजी विधान परिषदेची मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक, तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ, अशा ४ जागांकरिता निवडणूक होत आहे. 

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या विभागात आचारसंहिता कायम आहे. आचारसंहिता असताना अधिवेशनादरम्यान सरकारला कोणतीही नवी घोषणा किंवा निर्णय जाहीर करता येत नाहीत. त्यामुळे हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे.

कुरघोड्यांची चिन्हेलोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला बसलेला फटका आणि महाविकास आघाडीने मारलेली मुसंडी या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होत आहे. त्यामुळे मविआचे आमदार आक्रमक असतील. महायुतीतील कुरघोड्यांचे पडसादही उमटण्याची चिन्हे आहेत. 

टॅग्स :विधान भवनमहाराष्ट्र