मुंबईत पावसाळा सुरूच; अंधेरीमध्ये सर्वाधिक पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 05:29 AM2019-11-09T05:29:23+5:302019-11-09T05:29:39+5:30
चक्रीवादळाचा परिणाम; जोर ओसरला तरी प्रभाव कायम
मुंबई : अरबी समुद्रातल्या ‘महा’ या चक्रीवादळाचा जोर पूर्णत: ओसरल्यानंतरही त्याच्या किंचित प्रभावामुळे मुंबईत पावसाळा सुरूच आहे. मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवारी पहाटे साडेचार वाजल्यापासून साडेनऊ वाजेपर्यंत मुसळधार पाऊस कोसळला. मुंबईत ठिकठिकाणी ६० मिलीमीटरहून अधिक तर अंधेरीत सर्वाधिक १०९.६ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली.
‘महा’ हे चक्रीवादळ कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये कमकुवत झाले असून ते कोकण आणि गुजरात किनारपट्टीच्या ईशान्य अरबी समुद्रात आहे. त्यामुळे गुजरात आणि कोकणातही पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या २४ तासांत दीव येथे तब्बल ६५ मिमी, ठाणे येथे ४० मिमी, मुंबई ३३ मिमी, डहाणू १५ मिमी, वलसाड ६ मिमी, सूरतमध्ये ६ मिमी आणि भावनगर येथे ३ मिमी पावसाची नोंद झाली. शुक्रवारी सकाळी साडेनऊनंतर पावसाचा जोर ओसरला. मात्र शहरासह उपनगरावर पावसाचे ढग कायम होते. परिणामी काही काळ ऊन आणि काही काळ पाऊस असा ऊन-पावसाचा खेळ मुंबापुरीत रंगला होता. दुपारसह सायंकाळीही हीच परिस्थिती कायम होती. अधूनमधून सर्वत्र पावसाच्या सरी कोसळत होत्या.
दरम्यान, चक्रीवादळाचा प्रभाव कोकण आणि गुजरातच्या दक्षिणेकडील आणि किनारपट्टीवरील भागांवर प्रामुख्याने ठाणे, मुंबई, डहाणू, अलिबाग, सूरत, वापी येथे होता. शनिवारी चक्रीवादळाचा जोर आणखी कमी होणार असला तरी किनारपट्टीवर पूर्वेकडून वारे वाहणे सुरूच राहणार असून, गुजरात आणि कोकणात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत १५३.९ मिमी पाऊस
आॅक्टोबरप्रमाणेच नोव्हेंबर महिन्यातही मुंबई शहर आणि उपनगरात जलधारांचा मारा सुरूच आहे. स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, सांताक्रुझ वेधशाळेत नोव्हेंबर २०१९ च्या पहिल्याच दिवशी शहराच्या जवळच असलेल्या चक्रीवादळ ‘महा’मुळे ४६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. २०१० नंतरचा हा जास्त पाऊस असलेला यंदाचा नोव्हेंबर महिना आहे. तर, नोव्हेंबर महिन्यातील आतापर्यंतच्या हंगामात १५३.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून देण्यात आली.
नोव्हेंबर महिन्यातील हंगामी पाऊस तारखेनिहाय
दिनांक पाऊस (मिमी)
१ ७५
२ १२१.३
३ १२१.३
दिनांक पाऊस (मिमी)
४ १२१.३
५ १२१.३
६ १२१.३
दिनांक पाऊस (मिमी)
७ १२१.३
८ १५३.९
शुक्रवारी सकाळी नोंदविलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये)
अंधेरी १०९.६
गोरेगाव ७२.१५
दहिसर ४९.२४
बोरीवली ५५.३७
कांदिवली ५०.०२
चिंचोली ६३.२६
विलेपार्ले ६१.९८
सांताक्रूझ ६३.२२
दादर २८.२
वरळी ३४.४
देवनार २१.५९
विक्रोळी ५७.३८
भांडुप ३४.१
कांजूरमार्ग ४७.२४
मुलुंड ५५.८४
कुर्ला २९.२