१५ ऑक्टोबरपर्यंत मान्सूनचा मुक्काम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 05:38 PM2020-09-17T17:38:23+5:302020-09-17T17:39:02+5:30
चार आठवड्यांचा हवामानाचा अंदाज जाहीर
मुंबई : मुंबईत अधून-मधून सरींचा वर्षाव होत असला तरी राज्यात मात्र मान्सून धो धो कोसळत आहे. विशेषत: दुष्काळग्रस्त मराठवाड्यात तर जास्त पावसाची नोंद झाली असून, विदर्भातही मान्सून पुरेपुर कोसळला आहे. आता सप्टेंबरच्या मध्यात हवामान खात्याने पुढील चार आठवड्यासाठी पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार, देशभरात १५ ऑक्टोबरपर्यंत ब-यापैकी पावसाचा जोर कायम राहणार आहे. विशेषत: देशाच्या दक्षिण आणि मध्य भागात पावसाची हजेरी कायम राहणार असून, २० आणि २१ सप्टेंबर रोजी संपुर्ण कोकणास ऑरेंज अर्लट जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाने १७ सप्टेंबर रोजी पुढील चार आठवड्याचा अंदाज जाहीर केला आहे. पहिल्या आणि दुस-या आठवड्यात मध्य भारतासह दक्षिण भागात पावसाचा जोर कायम राहील. सरासरीच्या तुलनेत एवढा किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस या काळात कोसळेल. त्यानंतरच्या तिस-या आणि चौथ्या आठवड्यात मान्सूनचा जोर कमी होणार असला तरी याबाबतची अद्ययावत माहिती पुन्हा जारी केली जाणार आहे. गेल्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली असतानाच १८ आणि १९ सप्टेंबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे. तर १८ आणि १९ सप्टेंबर रोजी मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
----------------
पहिला आठवडा : १८ ते २४ सप्टेंबर -उत्तर भारतात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, मध्य भारतासह दक्षिण भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे. उत्तर पूर्व भारतातदेखील चांगला पाऊस पडेल. उत्तर पश्चिम भारतात बरा पाऊस कोसळेल.
दुसरा आठवडा : २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर - पश्चिम भारतासह दक्षिण भारतात चांगल्या पावसाची शक्यता आहे. देशाच्या उत्तर पश्चिम भागातही चांगला पाऊस होईल.
तिसरा आठवडा : २ ते ८ ऑक्टोबर : उत्तर पश्चिम भारतात चांगल्या पावसाची शक्यता आहे.
चौथा आठवडा : ९ ते १५ ऑक्टोबर : उत्तर पश्चिम भारतात पावसाचा जोर कमी होईल.