मान्सून आज मुंबईत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 06:35 AM2019-06-25T06:35:17+5:302019-06-25T06:35:21+5:30
कासवगतीने का होईना; मान्सूनचा प्रवास पुढे सरकत असून सोमवारी मान्सून मध्य अरबी समुद्र, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये दाखल झाला आहे.
मुंबई : कासवगतीने का होईना; मान्सूनचा प्रवास पुढे सरकत असून सोमवारी मान्सून मध्य अरबी समुद्र, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये दाखल झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे मान्सून आता अगदी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असून, मंगळवारी तो मुंबईत दाखल होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनचा पुढील प्रवास कायम वेगाने सुरू राहण्यासाठी हवामान अनुकूल आहे. येत्या ४८ तासांत मान्सून मध्य अरबी समुद्र, कोकण, मध्य महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये दाखल होईल. दरम्यान, गेल्या तीन दिवसांत मान्सूनचा प्रवास वेगाने होत असून महाराष्ट्र राज्यात मान्सून दाखल झाल्यापासून मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र येथे चांगला पाऊस पडत आहे.
दरम्यान, मुंबई शहर, उपनगरात दिवसभर पावसाचे ढग होते. प्रत्यक्षात दुपारचे काही क्षण पडलेल्या पावसाने नंतर पूर्ण वेळ विश्रांती घेतली. पूर्व उपनगरात दुपारी तीन वाजता ठिकठिकाणी सरी कोसळल्या, परंतु नंतर पाऊस फिरकला नाही. रात्री मुंबईवर दाटून आलेल्या ढगांचे प्रमाण खूप असल्याने मुंबईकरांना मोठ्या पावसाची अपेक्षा होती. मात्र, वरुण राजाने कृपादृष्टी दाखविली नाही.
हवामान ढगाळ
मान्सून मुंबईत मंगळवारी दाखल होण्याची शक्यता असून मंगळवारी आणि बुधवारी मुंबई आणि आसपासच्या प्रदेशात हवामान ढगाळ राहील. शिवाय शहर, उपनगरात ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.