मान्सूनची वाटचाल वेगाने; आगामी दोन दिवसात कोकणात दाखल होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 07:39 AM2022-06-02T07:39:29+5:302022-06-02T08:01:22+5:30
३ ते ५ जूनपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस, तर मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहणार आहे.
मुंबई : उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मान्सूनची वाटचाल वेगाने सुरू झाली असून, येत्या दोन ते तीन दिवसांत तो कोकणात पोहोचण्याचा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे.
नैर्ऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागांत, कर्नाटक, तामिळनाडूचा आणखी काही भाग, कोकण-गोव्याचा काही भाग, नैर्ऋत्य बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग, बंगालचा उपसागर, ईशान्येकडील राज्ये आणि सिक्कीमपर्यंत पुढील २ दिवसांत जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. गेल्या २४ तासांत गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर कोकणात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. उर्वरित राज्यात तापमान सरासरीच्या जवळपास होते.
२ जून रोजी कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून, सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, तर विदर्भात हवामान कोरडे राहील. ३ ते ५ जूनपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस, तर मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहणार आहे.