Join us

Monsoon Update: मुंबईत पावसाची दडी; कोकणात ऑरेंज अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 1:01 PM

Monsoon Update: मुंबईत बऱ्यापैकी जोर पकडलेल्या पावसाने पुन्हा एकदा दडी मारली असून, गुरुवारी तर त्याने पुन्हा विश्रांती घेतली. त्यामुळे मुंबईकरांचा दिवस कडाक्याच्या उन्हात न्हाहून निघाला.

मुंबई : मुंबईत बऱ्यापैकी जोर पकडलेल्या पावसाने पुन्हा एकदा दडी मारली असून, गुरुवारी तर त्याने पुन्हा विश्रांती घेतली. त्यामुळे मुंबईकरांचा दिवस कडाक्याच्या उन्हात न्हाहून निघाला. तर दुसरीकडे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना हवामान खात्याने शुक्रवारसह शनिवारी ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर रायगड जिल्ह्याला शनिवारसह रविवारसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईत वीकएंडला पावसाची शक्यता आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने २७ जूनपर्यंत पावसाचे इशारे दिले असून, मुंबई, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर,  उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविली आहे. दुसरीकडे गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार ते तुरळक ठिकाणी जोरदार आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

 ठळक  घडामोडीदक्षिण महाराष्ट्र किनारपट्टी ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत असलेले द्रोणीय क्षेत्र आता दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत आहे.

मान्सून महाराष्ट्रात कोसळत असून त्याची अपेक्षित परिक्षेत्र व्यापकता वाढीची अनुकूलता टिकून आहेच. सध्या मान्सून घाटमाथ्यावर रेंगाळताना दिसत आहे. हळूहळू काहीसा खाली वर्षाच्छायेच्या प्रदेशात उतरल्यानंतरच चांगल्या सर्वदूर पावसाची अपेक्षा करता येईल. मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. सोमवारपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार तर मुंबईसह कोकण, गोव्यात अतिजोरदार पावसाची शक्यता आहे.    - माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ 

टॅग्स :मुंबईपाऊस