मान्सूनचे १ जूनला केरळमध्ये होणार आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:06 AM2021-05-07T04:06:46+5:302021-05-07T04:06:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईवगळता उर्वरित महाराष्ट्रात अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे, तर वाढत्या उकाड्यासह उन्हाने नागरिक घामाघूम ...

Monsoon will arrive in Kerala on June 1 | मान्सूनचे १ जूनला केरळमध्ये होणार आगमन

मान्सूनचे १ जूनला केरळमध्ये होणार आगमन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईवगळता उर्वरित महाराष्ट्रात अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे, तर वाढत्या उकाड्यासह उन्हाने नागरिक घामाघूम हाेत आहेत. चढता पारा आग ओकत आहे. मात्र, आता यावर किंचित दिलासा म्हणून आतापर्यंत हवामानात नोंदविण्यात आलेल्या घडामोडींनुसार आणि प्रारंभिक संकेतानुसार १ जूनच्या सुमारास केरळवर मान्सूनचे वेळेवर आगमन होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. हे नमूद करतानाच प्रत्यक्षात १५ मे रोजी पावसाळ्याचा अधिकृत अंदाज जाहीर केला जाईल. ३१ मे रोजी पावसाचे अंदाज अद्ययावत केले जातील, असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश ते मराठवाड्यापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. ७ मे रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट तसेच सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. ८, ९, १० आणि ११ मे रोजीही राज्यात सर्वसाधारण अशीच परिस्थिती राहील.

मुंबईचा कमाल तापमानाचा पारा ३५ अंशांवर स्थिर असून, ढगाळ हवामानासह उकाड्यामुळे मुंबईकर गेल्या काही दिवसांपासून त्रस्त आहेत. गुरुवारी यात आणखी भर पडल्याने मुंबईकर घामाघूम झाले. गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या तुरळक भागात पावसाची नोंद झाली. कोकण, गोवा आणि मराठवाड्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या तुरळक भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले.

....................

Web Title: Monsoon will arrive in Kerala on June 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.