मुंबई : देशवासीयांची मान्सूनची प्रतीक्षा आता संपली आहे. कारण ३१ मे रोजीच्या आसपास मान्सून केरळात दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने शुक्रवारी वर्तविला आहे. तत्पूर्वी मान्सून दाखल होण्याची तारीख ३१ मे अशी असली तरी यात ४ दिवसांचा फरक असू शकतो, असेही हवामान खात्याने नमूद केले आहे.
दुसरीकडे अरबी समुद्रात उठलेले तौत्के या चक्रीवादळामुळेदेखील मान्सूनच्या आगमनास विलंब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. २१ मेपासून दक्षिण बंगाल खाडी, अंदमान, निकोबारमध्ये पाऊस क्रियाशील होईल. २१ मे रोजीच्या आसपास मान्सून अंदमान, निकोबारवर दाखल होईल. दरम्यान, मान्सून केरळात १ जूनच्या आसपास सर्वसाधारणरित्या दाखल होतो आणि त्याचा पुढील प्रवास वेळेत झाला तर महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची तारीख ही ७ जूनच्या आसपास असते. मात्र, मान्सूनच्या प्रवासात अडथळे आले तर मात्र महाराष्ट्रात मान्सून ११ जूननंतर दाखल होतो.
----------
मान्सून दाखल झाल्याच्या तारखा
२०१६ - ८ जून
२०१७ - ३० मे
२०१८ - २९ मे
२०१९ - ८ जून
२०२० - ५ जून