मुंबई/पुणे : अखेर शुक्रवारी महाराष्ट्रात दाखल झाला. कोकणासह दक्षिण महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्याच्या काही भागांत झालेला पाऊस हा मान्सूनच असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. मान्सूनपूर्व पावसाने मुंबईकडे मात्र पाठ फिरवली. गुरुवारी सकाळी धोधो बरसलेल्या मान्सूनपूर्व पाऊस त्यानंतर शुक्रवारी मात्र अपेक्षेप्रमाणे आला नाही. परिणामी उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना सध्या तरी मान्सूनची प्रतीक्षाच आहे. राज्यात दाखल झालेला मान्सून मुंबईत दाखल होण्यास किमान २४ तासांचा कालावधी लागेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.मराठवाड्याला जोरदार तडाखामान्सूनने मराठवाड्याला तडाखा दिला. लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात पहाटे धो-धो पाऊस झाला. औसा, निलंगा व देवणीसह लातूर जिल्ह्यात २२ ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. परभणी जिल्ह्यात पावसाने लेंढी नदीवरील पूल पाण्यात गेला व पाच गावांचा संपर्क काही काळासाठी तुटला होता. पुण्याच्या पुरंदर तालुक्यात जोरदार, तर सांगली, सातारा कोल्हापूर परिसरात तुरळक सरी बरसल्या.अनुकूल वातावरण असल्याने येत्या ४८ तासात मान्सून संपूर्ण राज्य व्यापेल, असा अंदाजही भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. मुंबईत सकाळी पाऊस आला. मात्र दिवसभरांच्या विश्रांतीनंतर रात्री तुरळक सरी कोसळल्या.पश्चिम महाराष्ट्रात सोलापूरात पावसाचा जोर होता. सांगली, सातारा कोल्हापूर परिसरात तुरळक सरी बरसल्या. विदर्भातही अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला.
मान्सून २४ तासांत मुंबईत येणार; हवामान विभागाने दिला दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 5:46 AM