Join us

पावसाळा संपणार, राज्यातून चार ते पाच दिवसांत पाऊस माघारी फिरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2018 7:43 AM

उकाडा वाढल्यामुळे नागरिक त्रस्त : परतीचा पाऊस राज्याच्या सीमेवर

मुंबई : उत्तर भारतातून परतीच्या प्रवासाला निघालेला मान्सून आज अखेर (बुधवारी) महाराष्ट्राच्या उत्तरी सीमेवर दाखल झाला आहे. सुरत, जळगाव, गोंदिया येथे परतीच्या पावसाची नोंद झाली असून, पुढील चार ते पाच दिवसांत मान्सून संपूर्ण राज्यातून माघार घेईल, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिली. दुसरीकडे मान्सून परतीच्या मार्गावर असतानाच आॅक्टोबर हीटचा तडाखा वाढत आहे. राज्यासह मुंबईच्या कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत असून, वाढत्या उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, नैर्ॠत्य मौसमी पाऊस पूर्व उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशच्या उर्वरित भागातून, बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडील काही भाग तसेच गुजरातच्या आणखी काही भागातून माघारी परतला आहे. गेल्या २४ तासांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. विदर्भात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. मुंबईतील वातावरणही शुष्क आणि कोरडे आहे. मुंबईचे कमाल तापमान ३४ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत असून, मागील तीन ते चार दिवसांपासून उकाड्यात वाढ झाल्याने मुंबईकर घामाघूम होत आहेत.

पर्यावरणतज्ज्ञ शिरीष मेढी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांच्या सरासरीनुसार २०१८मध्ये १०० टक्के पाऊस होईल, असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. पण प्रत्यक्षात सरासरीच्या ७७ टक्केच पाऊस झाला. १६४ तालुक्यांत ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला. धरणांतील पाणीसाठा एकूण ६५ टक्केच असून गतवर्षीच्या तुलनेने धरणांतील पाणीसाठ्यात १० टक्के घट झाली आहे. मराठवाड्यात परिस्थिती भीषण आहे. कारण तेथील धरणांत केवळ २८ टक्केच पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण ६५ टक्के होते. त्याआधी चार वर्षे तेथे दुष्काळ होता.अरबी समुद्रात चक्रीवादळअरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतरण ४८ तासांत चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. परिणामी ५ आॅक्टोबरनंतर मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.४ आॅक्टोबर : कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.५ आॅक्टोबर : गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.६ आणि ७ आॅक्टोबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील.४ आणि ५ आॅक्टोबर : मुंबई शहर आणि उपनगरात रात्री मेघगर्जनेसह पाऊस पडेल.

टॅग्स :पाऊसमुंबई