मान्सून तीन दिवसांत केरळात धडकणार; मुंबईत १३ जूननंतरच पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 02:32 AM2019-06-06T02:32:47+5:302019-06-06T06:30:29+5:30
केरळात दाखल होण्याचे संकेत मिळाले असले, तरी हवामानातील चढउतारामुळे कर्नाटकसह आंध्र प्रदेशात सुरुवातीला पुरेसा पाऊस पडणार नाही.
मुंबई : अनुकूल हवामानामुळे अंदमानातून मंगळवारी श्रीलंकेत दाखल झालेला मान्सून येत्या ४८ ते ७२ तासांत, ८ जूनला केरळात दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्यासह स्कायमेटने वर्तविला आहे. साधारणपणे मान्सून २५ मेपर्यंत मान्सून श्रीलंका व्यापतो. यावेळी तो तब्बल आठ ते दिवसांनी लांबणीवर आहे. केरळात दाखल होण्याचे संकेत मिळाले असले, तरी हवामानातील चढउतारामुळे कर्नाटकसह आंध्र प्रदेशात सुरुवातीला पुरेसा पाऊस पडणार नाही. येत्या २४ तासांत विदर्भात वादळ व काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अरुणाचल, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम व त्रिपुरामध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या चांगल्या हालचाली नोंदविण्यात येत आहे.
राज्यासाठी अंदाज
६ जून : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहील. विदर्भात उष्णतेची लाट राहील.
७ जून : विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहील. काही ठिकाणी उष्णतेची लाट राहील.
८ आणि ९ जून : विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहील. मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट राहील.
मुंबईसाठी अंदाज
६ आणि ७ जून : आकाश सामान्यत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २८ अंशाच्या आसपास राहील.