मान्सून यंदा ९८ टक्के बरसणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:06 AM2021-05-10T04:06:17+5:302021-05-10T04:06:17+5:30
सुपर कॉम्प्युटर वर्तवत आहे हवामानाची भाकिते (मुलाखत : सचिन लुंगसे) लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : देशाची मान्सून सरासरी ८८ ...
सुपर कॉम्प्युटर वर्तवत आहे हवामानाची भाकिते
(मुलाखत : सचिन लुंगसे)
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशाची मान्सून सरासरी ८८ सेंटिमीटर असून, यंदा देशात जून ते सप्टेंबरदरम्यान ९८ टक्के मान्सून कोसळण्याची शक्यता आहे, तर मान्सून उत्तर पश्चिम भारत आणि मध्य भारतात (महाराष्ट्रात) सरासरी कोसळेल, अशी माहिती भारतीय हवामान विभागातील वरिष्ठ वैज्ञानिक आणि मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे माजी उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ‘लोकमत’ला दिली. मुंबईत २४ आणि ४८ तासांसोबत आता दर ६ तासांचेही पूर्वानुमान दिले जाते. बदल मोठे असतील तर दर ३ तासांनी पावसाचा अंदाज वर्तविला जाताे. शेतकऱ्याला पुढच्या पाच दिवसांचे पूर्वानुमान दिले जाते. वादळ असेल तर २४ तास अगोदर माहिती दिली जाते. वाऱ्याचा वेग आणखी वेगाने समजेल यासाठीची यंत्रणा पश्चिम किनारी उभारण्याचे काम सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांच्याशी केलेली बातचीत.
१. समाज माध्यमांचा कसा वापर करत आहात?
भारतीय हवामान खाते हे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अधिपत्याखाली काम करते. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचा मजबूत पाठिंबा आणि सर्वसामान्य नागरिकांचा आधार या जोरावर हवामान खात्याचे काम सुरू आहे. २००३ पासून दीर्घकालीन पूर्वानुमान दिले जात आहे. २०१७ पासून क्लायमेट फॉर कास्टिंग सिस्टिम वापरली जात आहे. मुख्यालयात समाज माध्यमांचा एक भाग केला आहे. हवामान खात्याच्या प्रत्येक कार्यालयात असा भाग असून, नोडल ऑफिसर यासाठी काम करत आहेत. दामिनीसह मौसम, उमंग, मेघदूतसारखे अॅप विकसित केले आहेत.
२. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी काय करत आहात?
मान्सून हा शेतकऱ्याचा वर्षभराचा प्रोग्राम तयार करत असतो. आम्ही कृषी विज्ञान केंद्र उभारत आहोत. याद्वारे तालुकानिहाय हवामानाची माहिती मिळेल. व्हॉट्सअॅप ग्रुप तयार होत आहेत. स्थानिक भाषेत माहिती दिली जाते. अनेक शेतकरी हवामान विभागाशी जोडले गेले आहेत. पब्लिक इन्फॉर्मेशन सिस्टिम तयार केली आहे. नागरिकांना याची माहिती वेब पोर्टलवर देता येते.
३. पूर परिस्थिती, मोठ्या पावसाचे भाकीत कसे वर्तविणार?
फ्लड वॉर्निंग सिस्टिमद्वारे जिल्हा, तालुकास्तरावरील पुराचे भाकीत करता येते. याचा फायदा आपत्कालीन व्यवस्थापन विभागासह जनतेला होतो. मुंबईत खूप पाऊस पडणार असेल तर त्याची माहिती आम्ही वॉर्ड स्तरावर २४ ते ४८ तासांत देऊ शकतो. एवढी क्षमता आम्ही निर्माण केली आहे. शिवाय मोठ्या पावसाने पडणारा प्रभावही आम्ही सांगत आहोत.
४. डॉप्लर, रडारचा फायदा होत आहे का ?
किनारपट्टीच्या भागात ढगफुटी होण्याची शक्यता फारच कमी असते. ढगफुटी ही सर्वसाधारण दहा मिनिटे किंवा अर्धा तास होते. तीव्र पाऊस पडला आणि त्याने पंधरा मिनिटांत प्रलय आला तर त्यास ढगफुटी म्हणता येईल. डॉप्लर, रडार चार तास अगोदर माहिती देतात की संबंधित ठिकाणी मोठा पाऊस पडणार आहे. निरीक्षण प्रणालीत बदल झाले असून, पूर्वी आम्ही २०० किलोमीटरपर्यंतचे अंदाज देत होतो. आता १२ किलोमीटरखाली आलो आहोत. यासाठी सुपर कॉम्प्युटरचा आधार घेत आहोत.
......................................