जस्टीन बिबरच्या शोमध्ये चोरट्यांची कमाई
By admin | Published: May 14, 2017 08:17 AM2017-05-14T08:17:39+5:302017-05-14T08:17:39+5:30
भारतात प्रथमच नेरुळ येथे जस्टीन बिबरच्या झालेल्या कार्यक्रमात १३ जणांचे मोबाइल लंपास झाले आहेत.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - भारतात प्रथमच नवी मुंबईच्या नेरुळ येथे जस्टीन बिबरच्या झालेल्या कार्यक्रमात १३ जणांचे मोबाइल लंपास झाले आहेत. त्यांनी यासंबंधीची तक्रार नेरुळ पोलिसांकडे केली असून चोरीला गेलेले मोबाइल महागड्या कंपनीचे आहेत. यावरून बिबरच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून चोरट्यांनीही हात साफ करून घेतल्याचे दिसून येत आहे.
सामान्यांच्या आवाक्याबाहेर असलेला जस्टीन बिबरच्या गाण्यांचा कार्यक्रम बुधवारी नेरुळच्या डी. वाय. पाटील स्टेडिअममध्ये झाला. या कार्यक्रमास देशभरातून सुमारे ३५ हजार बिबरचे चाहते उपस्थित राहिले होते. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास बिबरच्या उपस्थितीनंतर त्याच्या गाण्यांच्या तालावर त्या ठिकाणी उपस्थित तरुण-तरुणी थिरकत होते. या वेळी बेधुंद होऊन ते आनंद घेत असतानाच, चोरट्यांनीही त्यांची, ‘हात की सफाई’ दाखवून दिली आहे. बिबरच्या चाहत्यांपैकी १३ जणांनी कार्यक्रमादरम्यान मोबाइल चोरीला गेल्याची तक्रार नेरुळ पोलिसांकडे केली आहे. तर त्यांच्या तक्रारीनुसार गुन्हे दाखल केल्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक राजपूत यांनी सांगितले. बिबर चाहत्यांच्या तक्रारींवरून त्या भव्य कार्यक्रमात चोरटेही घुसले असावेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कार्यक्रमाचे तिकीट दर हे ५ हजार ते ७० हजार रुपयेपर्यंतचे होते. त्यामुळे जमलेला प्रेक्षकवर्ग हा श्रीमंत कुटुंबातीलच होता. त्या सर्वांकडे महागड्या कंपन्यांचेच मोबाइल फोन होते. त्यापैकी अनेकांना उत्साहाच्या भरात स्वत:चे मोबाइल सांभाळण्याचेही भान न राहिल्याने ते पडले असावेत, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र, जर त्यांचे मोबाइल पडले असते, तर ज्यांना ते सापडले असतील त्यांनी ते पोलीस अथवा आयोजकांकडे परत करणे अपेक्षित होते. मात्र, सापडलेला मोबाइल परत केल्याचा एकही प्रकार नसल्याने चोरट्यांनीच हात साफ केल्याची दाट शक्यता आहे.